आर्थिक स्वातंत्र्य याकडे जाण्यासाठी दुसरी पायरी | पुढारी

आर्थिक स्वातंत्र्य याकडे जाण्यासाठी दुसरी पायरी

अनिल पाटील

आर्थिक स्वातंत्र्य मिळण्यासाठी वाढते वय आणि दैनदिन खर्च यानुसार ( कॅश फ्लो ) पैशाचा प्रवाह तयार करावा लागेल. स्वतःसाठी मोठा स्वातंत्र्यनिधी उभा करावा लागेल. हा किती निधी हवा याचा अंदाज बांधणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्याची दुसरी पायरी आहे.

आज आपल्या देशात वयाची साठी ओलांडलेल्या लोकांची अवस्था पहिली तर 74% लोक मनात इच्छा नसताना, शरीर साथ देत नसताना काहीतरी झेपेल ते काम पैशासाठी करताना दिसतात. साठीनंतर तुम्ही आयुष्यभर काम करीत असलेल्या ठिकाणी कोणीही काम देत नाही. मग शरीराला झेपेल ते काम करावे लागते. अशा लोकांनी स्वतःच्या आर्थिक स्वातंत्र्याचा कधीच विचार केलेला नाही. आयुष्यभर पैशासाठी काम केले आहे आणि आजही त्यांना करावे लागत आहे. ठराविक काळापर्यंत आपण जोमाने काम करू शकतो आणि त्यानंतर आपल्या पैशाने आपल्यासाठी काम केले पाहिजे. हे प्रत्येकाच्या आयुष्यातील पैशाच्या व्यवस्थापनेचा भाग आहे आणि हे जमलेच पाहिजे. अन्यथा आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य कधीच मिळणार नाही. आणि पारतंत्र्यात असल्यासारखे मरेपर्यंत काम करावे लागणार, हे लक्षात घेतले पाहिजे.

आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे दरमहा पैशासाठी काम न करता माझ्या खात्यामध्ये पैसा आला पाहिजे. कुटुंबाचा आजचा खर्च, वाढत्या महागाईनुसार पैशाच्या प्रवाहाची गरज किती आणि कशा प्रकारे लागणार आहे? हे मागील लेखात पहिले. जर तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य घ्यायचे ठरविले असेल, तर आयुष्यात कोणत्या वर्षापासून आर्थिक स्वातंत्र्य हवे त्यासाठी किती अवधी आहे, हे महत्त्वाचे आहे. कारण आर्थिक स्वातंत्र्य मिळण्यासाठी एक मोठा (स्वातंत्र्यनिधी) तयार करावा लागणार आहे. हा निधी योग्य ठिकाणी गुंतवणूक करून त्यामधून दरमहा पैशाचा प्रवाह बनविता येतो. मग हा निधी किती हवा? यासाठी खालील प्रश्नाची उत्तरे घेऊन हवी ती रक्कमही काढता येते. त्यासाठी उदाहरण पाहू.

जर आपणास 50 व्या पासून आर्थिक स्वातंत्र्य हवे असेल, तर तुमच्याकडे 3 कोटी 75 लाख इतका (स्वातंत्र्यनिधी) हवा. म्हणजे हा निधी योग्य ठिकाणी गुंतवणूक करून वयाच्या 80 वर्षांपर्यंत 30 वर्षे तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्यकाळात वयाच्या 52 व्या वर्षी दरमहा 97585/-, वयाच्या 62 व्या वर्षी दरमहा 1,91,965/-, वयाच्या 72 व्या वर्षी दरमहा 2,77,624/-, वयाच्या 77 व्या वर्षी दरमहा सुमारे 6,06,381/- रुपये अशा प्रमाणे खर्चासाठी पैसे उपलब्ध होणार आहे. असा हा वाढता खर्च आपण लक्षात घेतला पाहिजे. मग 3 कोटी 75 लाख इतका निधी उभारण्यासाठी 18 वर्षे अवधी मिळतो. इथे कमी कालावधीत मोठा निधी गोळा करण्यास मोठी गुंतवणूक करावी लागणार.

जर तुम्हाला वयाच्या 60 व्या वर्षी आर्थिक स्वातंत्र्य घेणार असाल, तर पुढच्या 20 वर्षांचा खर्च भागविण्यासाठी 4 कोटी 34 लाख निधी हवा. हा निधी उभारण्यासाठी 23 वर्षे अवधी मिळेल. वयाच्या 65 व्या वर्षी आर्थिक स्वातंत्र्य घ्यायचे ठरविले, तर उर्वरित 15 वर्षे आनंदात जगण्यासाठी 5 कोटी 09 लाख इतका निधी पाहिजे. मात्र हा निधी निर्माण करण्यासाठी तुमच्याकडे 28 वर्षे मिळतील.

मोठा निधी उभा करण्यासाठी कालावधी कमी असेल, तर गुंतवणूक मोठी करावी लागते. कालावधी मोठा असेल तर गुंतवणूक छोटी करून मोठा निधी उभारता येतो. म्हणून आर्थिक स्वातंत्र्याचा विचार करिअरच्या सुरुवातीला केला पाहिजे. तर तुम्हाला मोठा निधी निर्माण करण्यासाठी मोठा कालावधी मिळतो. अन् कमी रकमेच्या गुंतवणुकीत मोठा निधी निर्माण करता येतो. ही गोष्ट आजच्या तरुणांनी समजावून घेतली पाहिजे. कमी वय असणार्‍यांसाठी कमी रकमेमध्ये मोठी रक्कम उभी करण्यासाठी एक मोठी संधी आहे. याचा फायदा घेतला पाहिजे. पुढच्या सत्रात, लागणारा निधी कसा निर्माण करायचा ते पाहू.

Back to top button