संजय दत्तची विदर्भ वारी सुरुच; पुन्हा घेतली नितीन गडकरींची भेट | पुढारी

संजय दत्तची विदर्भ वारी सुरुच; पुन्हा घेतली नितीन गडकरींची भेट

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा : प्रख्यात बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने शनिवारी रात्री केंद्रीय महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांची नागपुरात भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री नागपुरचे पालकमंत्री नितीन राऊत यांचीही भेट घेतली. यावेळी राऊत आणि अभिनेता संजय दत्त यांनी रामटेक-खिंडसी परिसराची पाहणी केल्याची माहिती आहे.

संजय दत्तने अचानक नागपूर दौरा केल्यामुळे विदर्भात फिल्म इंडस्ट्रीच्या दृष्टीने प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी काळात फिल्मसिटी उभारली जाण्याची शक्यता आहे.

विदर्भात चित्रनगरी उभारण्याचे स्वप्न बऱ्याच काळापासून रखडले आहे. त्याला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. त्याच पार्श्वभूमीवर संजय दत्तने नागपूर दौरा केल्याचं बोललं जातं आहे.

या दौऱ्यात गडकरी आणि नितीन राऊत यांच्यासारख्या दोन पक्षांच्या दिग्गज नेत्यांशी त्यांनी भेटीगाठी घेतल्या. याशिवाय, संजय दत्तने शनिवारी गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयाचीही पाहणी केल्याची माहिती आहे.

नितीन राऊत यांच्या नागपूर येथील बेझनबाग निवासस्थानी जाऊन जून महिन्यात संजय दत्तने संपूर्ण कुटुंबाची भेट घेतली होती.

नितीन राऊतांच्या मुलाच्या लग्नाला उपस्थित राहू न शकल्यामुळे संजय दत्तने ही सदिच्छा भेट घेतली होती.

संजय दत्तचे पिता आणि दिवंगत अभिनेते सुनील दत्त हे काँग्रेसचे माजी खासदार होते.

तर त्याची मोठी बहीण प्रिया दत्तनेही काँग्रेसकडून खासदारकी भूषवली आहे. त्यामुळे दत्त कुटुंबीयांचे काँग्रेस नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत.

Back to top button