

मुंबई;पुढारी ऑनलाईन: देशातील कोणत्याही संघटनांची तालिबान्यांबराेबर तुलना करणे चुकीचे आहे. भारतासारख्या लाेकशाही देशात तालिबानी प्रवृती चालणारच नाही, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ (आरएसएस) , विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांचे समर्थन करणारेही तालिबान्यांसारखेच आहेत, असे मत प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी व्यक्त केले हाेते. याबाबत बाोलताना संजय राऊत यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली.
माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना ईडीने लूकआऊट नोटीस बजावल्याचे कळते, यासंदर्भात माध्यमांनी विचारणा केली असताना राऊत म्हणाले, अनिल देशमुख यांची कायदेशीर लढाई सुरु आहे. यावर आताच भाष्य करणे चुकीचे ठरेल.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचा उल्लेख पाठीत खंजीर खुपसणारे असा केला होता. याबाबत राऊत म्हणाले, आमची परंपरा पाठीत खंजीर खुपण्याची नाही. आम्ही समोरुन वार करताे. मध्य प्रदेशमध्ये माधवराव शिंदे यांचे पुत्र ज्योतिरादित्य शिंदे यांना फोडून भाजपने सरकार स्थापन केले. याला तुम्ही राजकारण म्हणता. तेच आम्ही महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार स्थापन केले ही पाठीत खंजीर खुपसणे कसे म्हणता, असा सवालही त्यांनी केला.
प्रत्येक जण आपला पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करत असतो. आमचे तीन पक्षांचे सरकार बहुमताचे आहे. आम्ही आता सत्तेत आहोत. तर भाजप विरोधी पक्षामध्ये आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल. तसेच पुढील निवडणुकीतही भाजपला विरोधी बाकावरच बसावे लागेल, असा टोलाही त्यांनी लगावला.
बेळगावमधील महापालिका निवडणुकीचे निकाल येत आहे. येथे कर्नाटक सरकारने सातत्याने मराठी बांधवांना दडण्यासाठी अनेक प्रयत्न केला आहे. आता लोकशाही मार्गाने बेळगावची जनता आपले मत व्यक्त करेल, असेही ते म्हणाले.
हेही वाचलं का ?