पोलिसांनी वाचवले मद्यपीचे प्राण; बारामती शहर पोलिसांची धावपळ कामी | पुढारी

पोलिसांनी वाचवले मद्यपीचे प्राण; बारामती शहर पोलिसांची धावपळ कामी

बारामती; पुढारी वृत्तसेवा: वेळ बुधवारी (दि. 21) रात्री पावणेअकराची… बारामती शहर पोलिस रात्रगस्त सुरू करण्याच्या तयारी होते… दिवस पाळीवरील अधिकारी-कर्मचारी नुकतेच घरी गेले होते. या वेळी शहर पोलिस ठाण्यात दूरध्वनी आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमच्या छतावर एक युवक चढल्याची बातमी त्यांनी दिली. पोलिसांनी तत्काळ तेथे जात दिनेश हनुमंत मिसाळ (वय 22, रा. आमराई, बारामती) या युवकाला प्रसंगावधान राखून खाली उतरवले.

याबाबतची माहिती पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी दिली. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमच्या छतावर एक युवक चढला असून तो आत्महत्या करण्याच्या तयारीत आहे, त्याचे घरात भांडण झाले असून त्यातून तो हे कृत्य करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गुन्हे तपास पथकाला सोबत घेत महाडीक यांनी घटनास्थळी जाण्यास सांगितले. पोलिस स्टेडियमवर पोहोचले असताना छतावर एक युवक धोकादायक स्थितीत उभा असल्याचे दिसले. तो दारूच्या अंमलाखाली होती.

घरात वाद झाल्याने त्याची मनःस्थिती ठीक नव्हती. तो टोकाला उभा राहिल्याने एवढ्या रात्री बघ्यांची मोठी गर्दी तेथे जमली. पोलिसांनी ही परिस्थिती अतिशय कौशल्यपूर्ण रितीने हाताळत त्याला भावनिक आवाहन करत खाली उतरण्याचे आवाहन केले. तो दारूच्या अंमलाखाली असल्याने एवढ्या उंचीवरून खाली येऊ शकत नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

त्याने तसा प्रयत्न केला तर तोल जाऊन दुर्घटना घडू शकते, हे लक्षात घेत त्याला मदत करत खाली आणत नातेवाईकांच्या ताब्यात दिले. दरम्यानच्या काळात अग्निशमन दलाला शिडी घेऊन बोलावण्यात आले होते. परंतु हे दल पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला व्यवस्थितरीत्या खाली घेत त्याचे प्राण वाचवले. ही कामगिरी सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वाघमारे, दशरथ कोळेकर, तुषार चव्हाण, बंडू कोठे, शेख, शिंदे, देवकर यांनी केली. मंगलदास निकाळजे, रवींद्र सोनवणे आदीनी पोलिसांना सहकार्य केले.

Back to top button