खेड तालुक्यात लम्पीचा प्रादुर्भाव; गायीचा मृत्यू | पुढारी

खेड तालुक्यात लम्पीचा प्रादुर्भाव; गायीचा मृत्यू

वाफगाव; पुढारी वृत्तसेवा: खेड तालुक्याच्या पूर्व भागात लम्पी स्किन या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढला असून, वाफगाव (ता. खेड) येथे एका गायीचा मृत्यू झाला आहे. हा आजार रोखण्यासाठी समर्थ फाउंडेशन यांच्या वतीने जनावरांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. परंतु, शासनाचे पशुधन पर्यवेक्षक मात्र या भागात फिरताना दिसत नाहीत.

वाफगाव येथे श्रेणी 2 राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना आहे. परंतु, या ठिकाणी पूर्ण वेळ पशुधन पर्यवेक्षक नसल्याने जनावरांच्या लम्पी स्किन आजारात वाढ होत आहे. येथील रामदास चिमण कराळे यांच्या गायीचा या आजाराने बुधवारी (दि. 21) मृत्यू झाला. या वेळी पंचनामा करण्यासाठी संबंधित पशुधन पर्यवेक्षिक यांना संपर्क साधला होता.

परंतु, ते आले नसल्याचे सरपंच उमेश रामाणे यांनी सांगितले. त्यामुळे ग्रामसेवक मुरलीधर बडे व सरपंच उमेश रामाणे यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. वरुडे (ता. खेड) येथे जनावरांच्या लम्पी स्किन आजाराचा प्रादुर्भाव वाढला असून, या ठिकाणी देखील पूर्व वेळ पशुधन पर्यवेक्षक नसल्याचे माजी सरपंच संतोष तांबे यांनी सांगितले.

Back to top button