पुणे : घरात घुसून ९ महिन्यात १० कोटींचा चुना; दरदिवशी एक घरफोडी अन् 25 लाखांचा ऐवज चोरीला | पुढारी

पुणे : घरात घुसून ९ महिन्यात १० कोटींचा चुना; दरदिवशी एक घरफोडी अन् 25 लाखांचा ऐवज चोरीला

अशोक मोराळे
पुणे : पुण्यात चारशेपेक्षा अधिक घरफोड्या होऊनही त्यापैकी केवळ एकतृतीयांश घरफोड्याच उघडकीस आल्या आहेत, तर केवळ दहा टक्केच मुद्देमाल पोलिसांना जप्त करता आला आहे. या घरफोड्यांमध्ये दहा कोटींपेक्षा जास्त रुपयांचा ऐवज चोरीला जाऊनही पोलिस मात्र गुन्हेगारापर्यंत पोहचू शकत नाहीत, हे गेल्या नऊ महिन्यांतील पोलिसांच्या नोंदीतून उघड झाले आहे. त्यामुळे ‘पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे पुणेकर कंगाल अन् चोरटे मालामाल’ असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

पुणे पोलिस आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी ते 16 सप्टेंबर या कालावधीत शहरातील 32 पोलिस ठाण्यांच्या हद्दीत 424 घरफोड्या झाल्या. त्यापैकी केवळ 153 म्हणजेच केवळ 36 टक्के घरफोड्या उघडकीस आल्या. झालेल्या घरफोड्यांमध्ये एकूण सव्वादहा कोटी रुपयांचा ऐवज चोरीला गेला. तपासणीत मात्र केवळ एक कोटी 38 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला.

ही पोलिस ठाणी आहेत हॉटस्पॉट
शहर पोलिस आयुक्तालयातील 32 पोलिस ठाण्यांपैकी कोंढवा, हडपसर, भारती विद्यापीठ, सिंहगड रोड, लोणीकंद ही पाच पोलिस ठाणी घरफोड्यांचे हॉटस्पॉट असल्याचे दिसून आले आहे. कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक घरफोड्या झाल्या आहेत. दाखल घरफोड्यांच्या तुलनेत उकल होण्याचे प्रमाण काही पोलिस ठाण्यांचे
निम्मे आहे, तर काही ठाण्यांचे अगदी नगण्य आहे.

हडपसर, कोंढवा आघाडीवर!
परिमंडल 5 च्या हद्दीत सर्वाधिक घरफोड्या झाल्या असून, हडपसर व कोंढवा ही दोन पोलिस ठाणी आघाडीवर आहेत. त्यानंतर दुसरा क्रमांक परिमंडल 4 चा लागतो. तेथे लोणीकंद, चतुःशृंगी आणि विश्रांतवाडी पोलिस ठाणी पुढे आहेत. परिमंडल 3 तिसर्‍या स्थानी येते. तेथील सिंहगड, वारजे माळवाडी आणि कोथरूड पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सर्वाधिक घरफोड्या झाल्या आहेत. चौथा क्रमांक परिमंड2 2 चा असून, भारती विद्यापीठ पोलिस ठाणे आघाडीवर आहे.

तेथे 49 घरफोड्या झाल्या असून, 36 घरफोड्या एकट्या भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत झाल्या आहेत. शहरातील संघटित गुन्हेगारीचा बंदोबस्त करण्यात पोलिसांना यश आले असले, तरी भुरट्या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात हवे तेवढे यश आल्याचे दिसून येत नाही. दिवसेंदिवस घरफोडीच्या घटनांत मोठी वाढ होताना दिसत आहे. काबाडकष्ट करून प्रसंगी पोटाला चिमटे काढून जमा केलेली पुंजी व किमती ऐवज चोरटे लंपास करीत आहेत. बंद घरे प्रामुख्याने चोरट्यांच्या टार्गेटवर असल्याचे दिसून येते.

चोरटे दिवसा रेकी करून रात्री घरावर हात साफ करीत आहेत. भरदिवसा देखील घरफोड्या होऊ लागल्या आहेत. उत्तमनगर परिसरात अवघ्या तीन तासांत चोरट्यांनी घरातून 42 तोळे सोने व रोकड चोरी केली. दरम्यान, हडपसर परिसरात वास्तव्यास असलेल्या टोळ्यांचे एकेकाळी शहरातील घरफोड्यांत वर्चस्व होते. त्यातील बहुतांश गुन्हेगार हे आता कारागृहात बंद आहेत.

मात्र, असे असताना देखील घरफोड्यांच्या घटनांना आळा बसल्याचे दिसून येत नाही. आपल्या फ्लॅट, घरात घरफोडी होऊ नये म्हणून नागरिकांनी खबरदारी घ्यावी. सोसायट्यांना सुरक्षारक्षक नेमावेत, सीसीटीव्ही बसवावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. मात्र, पोलिसांनी देखील या काळात शहरातील गस्त वाढविण्याची आवश्यकता आहे. त्याबरोबरच असे गुन्हे करणार्‍यांची झाडाझडती घेऊन त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यामुळे घरफोडीचे गुन्हे कमी होतील.

घरफोड्यांचे हॉटस्पॉट असलेली ठाणी
कोंढवा 67 दाखल घरफोड्या 32 घरफोड्या उघड
हडपसर 64 दाखल घरफोड्या 34 घरफोड्या उघड
लोणीकंद 27 दाखल घरफोड्या 5 घरफोड्या उघड
सिंहगड रोड 29 दाखल घरफोड्या 13 घरफोड्या उघड
भारती विद्यापीठ 36 दाखल घरफोड्या 4 घरफोड्या उघड

पुणेकरांनो, अशी घ्या खबरदारी
बाहेर जाताना घरात मौल्यवान वस्तू ठेवू नका.
बाहेरगावी जाताना शेजार्‍यांना कल्पना द्या.
सोसायटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवा.
सोने, रोकड, दागिने घरात ठेवू नयेत, ते सुरक्षितरीत्या बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावेत.
घरासमोर पेपर पडू देऊ नका. त्याद्वारे चोरट्यांना फ्लॅट बरेच दिवस बंद असल्याचे समजते.
सोसायटीमधील अनेक व्यक्ती बाहेरगावी जाणार असतील, तर पोलिसांना त्याची कल्पना द्या.
सोसायटीमध्ये पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी केलेल्या सुरक्षारक्षकाची नेमणूक करा.
घराबाहेर जाताना मुख्य दरवाजाची कडी व कुलूप लावू नये. त्याऐवजी लॅचलॉकचा वापर करावा.
यामुळे चोराला घरात कोणी आहे किंवा नाही याचा अंदाज घेता येत नाही.
बाहेर पर्यटनाला गेल्यानंतर शक्यतो तेथील फोटो सोशल मीडियावर टाकण्याचे टाळा.
कारण, चोरटे त्यावरून देखील घरात कोणी नसलेल्या संधीचा फायदा घेत चोरी करतात.

तपास पथके नेमके करतात काय?
पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात स्वतंत्र तपास पथक असते. त्या तपास पथकाच्या कामावर पोलिस ठाण्याच्या कामाचे मूल्यमापन होत असते. मात्र, काही पोलिस ठाण्यांची तपास पथके सोडता इतर पथके नेमके कोणते काम करतात, हेच दिसून येत नाही. आपल्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांचा छडा लावण्याची जबाबदारी प्रामुख्याने त्यांच्यावर असते. मात्र, सध्याच्या कालावधीत त्यांच्या कामाचा फारसा प्रभाव पडलेला दिसत नाही.

तपास पथकाचा पदभार घेण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षकापासून ते कर्मचार्‍यांपर्यंत सर्वांना आवड असते. त्यासाठी इकडून-तिकडून प्रयत्न देखील केले जातात. अनेकदा कामाचे मूल्यमापन, त्यांचा जनसंपर्क, खबर्‍यांचे जाळे या गोष्टींना फाटा देऊन एखाद्या मर्जीतल्या व्यक्तीला तेथे बसविले जाते. या सर्व गोष्टींबाबत संबंधित व्यक्ती अनभिज्ञ असल्यामुळे त्याचा परिणाम तेथील डिटेक्शनवर होताना दिसून येतो, तर काही अधिकारी कर्मचारी तपास पथकात राहून भलतीच कामे करीत असतात. गुन्ह्यांच्या तपासाऐवजी त्यांना कागदातच जास्त इंटरेस्ट असतो. त्यामुळे एकंदरीत या सर्व बाबींचा परिणाम डिटेक्शनवर होताना दिसून येतो.

Back to top button