पुणे : ‘टॉयलेट’ची स्वच्छता आता ठेकेदाराकडे! | पुढारी

पुणे : ‘टॉयलेट’ची स्वच्छता आता ठेकेदाराकडे!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसाठी महापालिकेच्या यंत्रणेच्या माध्यमातून वर्षाला कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. तरीही सर्व स्वच्छतागृहे अस्वच्छ असतात. त्यामुळे शहरातील स्वच्छतागृहे खासगी यंत्रणेकडून ठेकेदारांमार्फत स्वच्छ करून घेण्यात येणार आहेत.  महापालिकेच्या वतीने शहरातील विविध भागांमध्ये जवळपास 1200 स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात आली आहे. यामध्ये सार्वजनिक युरिनल आणि सार्वजनिक शौचालयांचाही समावेश आहे. या सर्व स्वच्छतागृहांची दररोज दोन वेळा स्वच्छता करण्याची जबाबदारी महापालिकेच्या स्वच्छता कर्मचार्‍यांची आहे. यासाठी वर्षाला कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. तरीही ही स्वच्छतागृहे अस्वच्छ व दुर्गंधी पसरलेलीच असतात.

या पार्श्वभूमीवर शहरातील महापालिकेच्या सर्व स्वच्छतागृहांची स्वच्छता करण्यासाठी निविदा काढून खासगी संस्थांची नेमणूक केली जाणार आहे. पाच झोनसाठी वेगवेगळ्या पाच निविदा काढण्यात येणार आहेत. यासाठी पाच वर्षाला 52 कोटी 53 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले.

पालिकेच्या जेटिंगचाही होणार वापर
महापालिकेकडे 41 जेटिंग मशिन आहेत. या मशिन स्वच्छतागृहांची स्वच्छता करणार्‍या ठेकेदारास भाडेकराराने दिल्या जाणार आहेत. त्यामुळे स्वच्छतेचे काम खासगी ठेकेदाराला गेले, तरी पालिकेच्या मशिनचा वापर होणार आहे, तसेच महापालिकेला उत्पन्नही मिळणार आहे.

पालिका उभारणार ‘एसी टॉयलेट’
महापालिकेच्या वतीने शहरात वातानुकूलित स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर सुरुवातीला एकाच ठिकाणी हे वातानुकूलित स्वच्छतागृह सुरू केले जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
शहरातील नागरिकांसाठी महापालिकेच्या वतीने विविध रस्त्यांच्या कडेला आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहांची उभारणी केली जाते. शहरात एकूण 1,381 सार्वजनिक स्वच्छतागृहे असून, त्यात झोपडपट्ट्यांमध्ये 861, सार्वजनिक ठिकाणी 363 स्वच्छतागृहे आणि 157 युरीनल (मुतार्‍या) चा समावेश आहे.

शहरातील स्वच्छतागृहांचा दर्जा चांगला होण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून प्रायोगिक तत्त्वावर वातानुकूलित स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहे. यासाठी एका कंपनीचा प्रस्ताव महापालिकेकडे आला आहे. पंचतारांकित हॉटेलसारखे हे स्वच्छतागृह असणार आहे. याची सर्व देखभाल हीच कंपनी करणार असून, महापालिकेला कोणताही खर्च करावा लागणार नाही, असेही विक्रम कुमार यांनी सांगितले आहे.

Back to top button