बारामती : शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याची अट रद्द करा | पुढारी

बारामती : शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याची अट रद्द करा

बारामती; पुढारी वृत्तसेवा: ग्रामीण भागात सरकारी शाळांमध्ये काम करणार्‍या शिक्षकांनी मुख्यालयी राहावे; अन्यथा त्यांचा घरभाडेभत्ता बंद करावा, असा मुद्दा काही दिवसांपूर्वी आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत उपस्थित केला. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले. यानुषंगाने मुख्यालयी राहण्याची अट रद्द करावी, अशी महत्त्वपूर्ण मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष केशवराव जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

याबाबतची माहिती बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष हनुमंत शिंदे व सरचिटणीस सुरेंद्र गायकवाड यांनी दिली. नुकतीच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या नंदनवन या निवासस्थानी भेट घेतली व विविध मागण्यांचे निवेदन दिले. या वेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते माधवराव पाटील, अध्यक्ष केशवराव जाधव, माजी अध्यक्ष राजाराम वरुटे, सल्लागार वसंत हारुगडे, ठाणे जिल्हाध्यक्ष भगवान भगत, सरचिटणीस विजय पडवळ उपस्थित होते.

पूर्वी दळणवळणाच्या सुविधांचा अभाव होता, संपर्कसाधने नव्हती. त्यामुळे शिक्षकांना शाळेच्या गावातच राहावे लागायचे. आता ती परिस्थिती राहिलेली नाही. शिक्षक भौतिक सुविधा असणार्‍या शहराच्या ठिकाणी राहून वेळेवर शाळेत पोहचू शकतात तसेच शासनाने शाळेच्या गावी निवासस्थाने बांधली नसल्याने राहण्याची सक्ती करणे अन्यायकारक आहे.

कोरोना काळात शिक्षकांनी जवळपास दोन वर्षे विद्यार्थ्यांना मोबाईलवरून दर्जेदार ऑनलाइन शिक्षण दिले आहे. मुख्यालयी राहण्याचा व गुणवत्तेचा संबंध जोडणे अनाकलनीय आहे. त्यामुळे मुख्यालयी राहण्याची अट रद्द करावी तसेच कोणाही कर्मचार्‍याचा घरभाडेभत्ता बंद करू नये, अशी विनंती मुख्यमंत्री यांना करण्यात आली आहे. तसेच अन्य मागण्या करण्यात आल्या. शिक्षक संघाच्या सर्व मागण्यांसंदर्भात लवकरच मंत्रालयात संघटना प्रतिनिधींसोबत स्वतंत्र बैठक घेऊन चर्चा करून सर्व प्रश्न निकाली काढू, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

Back to top button