पुणे : सार्वजनिक मंडळांची उलाढाल तब्बल दीडशे कोटींची | पुढारी

पुणे : सार्वजनिक मंडळांची उलाढाल तब्बल दीडशे कोटींची

शंकर कवडे

पुणे : पुण्यातील सार्वजनिक मंडळांकडून यंदाच्या गणेशोत्सवात करण्यात आलेला एकूण खर्च दीडशे कोटी रुपयांवर जाऊन पोहोचला असल्याचे स्पष्ट झाले आहे. मंडप, सजावट, डीजे, मिरवणुकीची पथके यांतून ही उलाढाल लक्षणीयरीत्या वाढल्याचे दिसून येते.
पुण्यात नोंदणीकृत चार हजार, तर नोंदणी नसलेली तेवढीच मंडळे आहेत. एकूण आठ हजार मंडळांपैकी लहान मंडळे निम्मी म्हणजे चार हजार, मध्यम मंडळे अडीच हजार, तर मोठी मंडळे सुमारे दीडशे आहेत. लहान मंडळांचे उत्पन्न आणि खर्च एक ते दोन लाखांपर्यंत मध्यम मंडळांचे 2 ते 5 लाखांपर्यंत, तर मोठ्या मंडळांचे 5 ते 10 लाखांपर्यंत आहे. याचाच अर्थ लहान मंडळांची उलाढाल 60 कोटींची, मध्यम मंडळांची 75 कोटींची, तर मोठ्या मंडळांची 12 कोटींची झाली. म्हणजेच पुण्यातील सर्व मंडळांची एकूण उलाढाल सुमारे दीडशे कोटींची झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहरातील मंडळांची संख्या – 4 हजार 500
ढोल-ताशा पथकांची संख्या – 125 ते 130
जिल्ह्यातील पथकांची संख्या – 45 ते 50
पथकांची संख्या – दहा मंडळामागे दोन मंडळे

विद्युत माळा, दिव्यांची आकर्षक रोषणाई
बाजारपेठेत स्वदेशी एलईडी माळांसह चिनी माळांना मोठी मागणी राहिली. दर वर्षीप्रमाणे यंदाही विविध प्रकारचे आकर्षक दिवे, तसेच विद्युत माळा बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या होत्या. गतवर्षीच्या तुलनेत यंदा इलेक्ट्रिक वस्तूंचे मार्केटमध्येही मोठ्या प्रमाणात उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले. सजावटीच्या इलेक्ट्रिक वस्तूंची उलाढाल 40 कोटी

शहरासह जिल्ह्यातील ढोलपथके, डीजे बुकिंग फुल्ल
शहरातील प्रमुख मंडळांनी ढोल-ताशा पथक नेहमीप्रमाणे बुक केले होते. निर्बंधमुक्त गणेशोत्सवाची घोषणा झाल्यानंतर मंडळांकडून ढोल-पथकांसह डीजेंची विचारणा होऊ लागली. गणरायाच्या प्रतिष्ठापनेसह विसर्जनासाठी वादकांच्या संख्येनुसार ढोल पथकांकडून तर आवाजानुसार डीजेवाल्यांकडून पैशांची मागणी होऊ लागली. ढोल पथकासाठी सरासरी 40 हजार, तर डीजेसाठी 1 लाख रुपये मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोजल्याचे सांगितले. डीजे, ढोलपथकांची उलाढाल -100 कोटी

फुलांची उलाढाल तेजीत
हारासाठी झेंडू, गुलछडी, शेवंती, गुडछडी आणि डच गुलाबाच्या फुलांना शहरातील हार विक्रेत्यांकडून मोठी मागणी राहिली. यंदा हारामध्ये कापडी फुले, मोती, मणी यांचाही वापर केल्याचे दिसून आले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुलटेकडी मार्केट यार्डातील फुलबाजारात सर्व प्रकारच्या फुलांची आवक वाढली होती. महिला वर्गाकडून गजर्‍याला मागणी वाढल्याने गजर्‍याच्या फुलांचीही चांगली आवक झाली. जिल्ह्याच्या विविध भागांतून 50 हून अधिक प्रकारातील फुले, तसेच सजावटीशी संबंधित घटक लाखो किलोंच्या स्वरूपात फुले बाजारात येत होती. पावसाने ओल्या फुलांचे प्रमाण जास्त राहिल्याने आवक घटून सुरुवातीला दर घसरले, मात्र गणेशोत्सवातही या फुलांना मागणी व दर चांगले मिळाले. फुलांची उलाढाल – 20 कोटी

मंडप, सजावटीसाठी लाखोंचा खर्च

मंडळाच्या मंडपासाठी लहान मंडळांनी 25 हजार ते 1 लाख रुपये, तर मोठ्या मंडळांनी 1 लाख रुपयांपासून ते दहा लाख रुपयांपर्यंत खर्च केला. भाडेतत्त्वावर घेतलेल्या देखाव्यासाठी कमीत कमी 5 ते 10 हजार आणि जास्तीत जास्त दोन लाख रुपये मंडळांनी खर्च केले. याखेरीज रोषणाई, कारंजे आदींसाठी लाखापासून ते दहा लाखांपर्यंत सरासरी खर्च आल्याचे मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
मंडप, सजावटीची उलाढाल – 50 कोटी

विड्याची पाने, शमी, दुर्वामध्येही मोठी उलाढाल
पूजेसाठी विड्याच्या पानांसह कमळ, केवडा व दूर्वांना मोठी मागणी राहिली. पान बाजारात एका पाटीला चारशे रुपयांपासून 1 हजार 200 रुपयांपर्यंत भाव मिळाला तर, किरकोळ बाजारात दहा रुपयांना पंधरा तसेच वीस पानांची विक्री करण्यात आली. बाजारात आठवड्यातून चार दिवस एका पाटीमध्ये जवळपास 2 ते 3 हजार पाने, पुडक्यामध्ये 6 हजार तर एका डागामध्ये 12 हजार पाने बाजारात दाखल होत होती. किरकोळ बाजारात दूर्वा 10 ते 22 रुपये जुडी, शमी 10 रुपये, केवडा 30 ते 100 रुपये व कमळाच्या एका नगाची 10 ते 20 रुपयांना विक्री होऊन हजारोंची उलाढाल झाली.
गणेशप्रिय पत्री व फुलांची उलाढाल : 50 लाख

Back to top button