पुणे : मंदीचे विघ्न विघ्नहर्त्याने केले दूर | पुढारी

पुणे : मंदीचे विघ्न विघ्नहर्त्याने केले दूर

शंकर कवडे
पुणे : कोरोनारूपी राक्षसाने आणलेले मंदीचे सावट विघ्नहर्त्याने दूर केले अन् गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या काळात पुण्यात तब्बल बाराशे कोटी रुपयांची उलाढाल झाली. गणेशोत्सव 2 वर्षांनंतर निर्बंधमुक्त झाल्याने गणरायाच्या मूर्तीपासून ते विसर्जनच्या रथापर्यंत पुणेकरांनी मुक्तहस्ते पैसे खर्च केल्याचे संपूर्ण उत्सवाचा आढावा घेताना स्पष्ट झाले.

सार्वजनिक तसेच घरोघरी लाडक्या गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर फूल, नारळ, फळे, मिठाई, विद्युत माळा, सराफा व्यावसायिक, मंडप व्यावसायिक, देखावे तयार करणारे सजावट कारागिरांसह विक्रेते यामध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे व्यावसायिकांपासून किरकोळ विक्रेते, कारागिरांपर्यंतच्या सर्वांना विघ्नहर्त्याने दिलासा दिल्याचे दिसून आले. गणपती, गौराईसाठी राज्यासह देशभरातून प्रतिष्ठापनेसाठी लागणार्‍या पाच फळांसह गौराईच्या फळावळीसाठी बाजारात संत्री, मोसंबी, चिक्कू, पेरू, सफरचंद  यांसह विविध फळांना मागणी राहिली. राज्यासह हिमाचल प्रदेश येथून फळ बाजारात फळांची मोठी आवक झाली. (पूर्वार्ध)

सत्तर टक्के पीओपी तर  उर्वरित शाडू, मातीच्या मूर्ती
गणेशमूर्ती रंगकामासाठी कमी वेळ मिळाल्याने यंदा नेहमीच्या तुलनेत तीस टक्क्यांनी उत्पादन कमी झाले, त्यामुळे पीओपी मूर्तींच्या दरातही दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली होती. शाडू व अन्य मूर्तींचे प्रमाण यंदा नेहमीसारखेच राहिले. गणेशमूर्तीची किंमत पाचशे रुपयांपासून पंचवीस हजारांपर्यंत होती.

प्रतिष्ठापनेचे स्वरूप – मूर्तींची संख्या
घरगुती – सुमारे सात लाख
सार्वजनिक – सुमारे दहा हजार
पीओपी- सहा लाखांहून अधिक
शाडू – सत्तर ते ऐंशी हजार
गणेशमूर्तींची उलाढाल : 20 कोटी

दररोज तीन लाखांहून अधिक नारळ
बाजारात दररोज तीन ते चार हजार पोत्यांमधून जवळपास तीन लाखांहून अधिक नारळांची आवक झाली. धार्मिक विधी, तोरण यासाठी तामिळनाडूच्या वाणी अंबाडी भागातून येणार्‍या नव्या नारळास तर मोदकांसाठी साफसोल व मद्रास नारळास चांगली मागणी होती. बाजारात 20 रुपयांपासून 40 रुपयांपर्यंत नारळाची विक्री झाली.

विविध फ्लेवर्सचे  लाखो मोदक फस्त
विक्रेत्यांकडून उकडीच्या मोदकांची आगाऊ नोंदणी करत विक्री करण्यात येत होती तर, माव्याच्या मोदकासह चॉकलेट, पान, रसमलाई, केशर-मावा, ओरिओ, रोझ-गुलकंद, ड्रायफ्रूट, अंजीर, श्रीखंड यांसारखे विविध फ्लेवर्सच्या मोदकांनाही मोठी मागणी राहिली. बाजारात एका उकडीच्या मोदकाची 30 ते 50 रुपये तर अन्य मोदकांची 500 ते 1 हजार रुपये किलो दराने विक्री सुरू होती. यंदा गौराई पूजनावेळी लागणार्‍या फराळाच्या मागणीतही वाढ झाल्याचे सांगण्यात आले. लाडू नग तर चिवडा, शेवई, शंकरपाळी आदी साहित्य पाव किलोच्या पाकिटांमध्ये उपलब्ध झाले होते.
– मोदक फराळाची उलाढाल : 30 कोटी

चांदीच्या दागिन्यांना मोठी पसंती
1 सप्टेंबर रोजी चांदीचा दर 51 हजार 850 रुपयांवर गेल्यावर या काळात मोठी उलाढाल झाली. कारागिरांनी आकर्षक डिझाईनमध्ये मोदक, रत्नजडित मुकुट, तोडे, जानवे, मूषक, दुर्वाहार, कडे, बाजूबंद, पानसुपारी, जास्वंदीचा हार, मोत्यांचा हार, त्रिशूळ, सोंडपट्टी, शेला, भीकबाळी, छत्री, उपरणे आदी सोन्या-चांदीमधील आभूषणे घडविली होती. याखेरीज, बाजारात मिनार असलेले रंगीबेरंगी फुले, केवड्याची फुले आणि फळांची परडी अशा चांदीच्या दागिन्यांमध्ये वेगवेगळे प्रकार उपलब्ध झाले होते. यामध्ये, चांदीच्या दुर्वांना सर्वाधिक मागणी राहिली. त्यामुळे, गणेशोत्सवात चांदीच्या विक्रीत तिप्पट ते चौपट वाढ झाली. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांकडूनही चांदीचे अलंकार सार्वजनिक मंडळांच्या गणपतीला अर्पण करण्याचा कल दिसून आला.
– दागिन्यांची एकूण उलाढाल : 300 कोटी.

नारळ : शेकडा दर
मद्रास: 2 हजार 600 ते 2 हजार 700
पालकोल : 1 हजार 450 ते 1 हजार 550
नवा नारळ : 1 हजार 300 ते 1 हजार 500
साफसोल : 1 हजार 500 ते 2 हजार 500
एकूण उलाढाल : 4 कोटी.

घाऊक फळबाजारातील उलाढाल
फळे आवक          (क्विंटल)      बाजारभाव (सरासरी)       उलाढाल (सरासरी)
संत्री               1 हजार 759          4 हजार 500                   79 लाख
मोसंबी             53 हजार              3 हजार 900                 2.11 कोटी
चिकू               1 हजार 188           2 हजार 300              27.32 लाख
सफरचंद          11 हजार 791          8 हजार                   9.43 कोटी
पेरू                    2 हजार 637          2 हजार 500             65.92 लाख
फळांची एकूण उलाढाल : सुमारे 80 कोटी

Back to top button