पुणे : 61 लाखांची सोन्याची बिस्किटे पकडली | पुढारी

पुणे : 61 लाखांची सोन्याची बिस्किटे पकडली

पुणे; पुढारी वृत्तसेवा: दुबईहून विमानातून तस्करी करून आणलेली सुमारे 61 लाख रुपये किमतीची सोन्याची दहा बिस्किटे केंद्रीय सीमाशुल्क विभागाने (कस्टम) लोहगाव विमानतळावर जप्त केली. या बिस्किटांचे वजन एक किलो 166 ग्रॅम आहे. दुबईहून लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन दिवसांपूर्वी पहाटे विमान उतरले. हे विमान पुढे देशांतर्गत वाहतुकीसाठी रवाना होणार होते.

या विमानाची कस्टमच्या पथकाकडून तपासणी करण्यात आली. त्या वेळी प्रवाशांच्या आसनाखाली एका प्लास्टिकच्या पिशवीत 10 सोन्याची बिस्किटे आढळून आली. 61 लाख 70 हजार रुपये किमतीच्या या बिस्किटांचे वजन 1 किलो 166 ग्रॅम इतके आहे. सोन्याची बिस्किटे तस्करी करून आणल्याचा संशय कस्टमच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

गेल्या महिन्यात सोने तस्करीचे दोन प्रकार उघडकीस आले. एका प्रवाशाने आपल्या पादत्राणात 30 लाख 45 हजार रुपयांचे 650 ग्रॅम वजनाचे सोने लपवून आणले होते. त्याला अटक करण्यात आली होती. दुसर्‍या एका प्रकरणात 32 लाख रुपयांचे परदेशी चलन पुण्यातून घेऊन जात असताना एका प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले.

Back to top button