पुणे : ग्रामदेवतेचे दर्शन न घेताच मुख्यमंत्री आले अन् गेले! | पुढारी

पुणे : ग्रामदेवतेचे दर्शन न घेताच मुख्यमंत्री आले अन् गेले!

पुणे; पुढारी वृत्तसेवा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी पुण्यातील काही मानाच्या गणेश मंडळांना भेट देऊन दर्शन घेतले असले, तरी पुण्याची ग्रामदेवता आणि मानाचा दुसरा गणपती असलेल्या तांबडी जोगेश्वरी गणपतीला मात्र भेट दिली नाही. याशिवाय, हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या गणपती बाप्पाच्या दर्शनालाही मुख्यमंत्री पोहोचले नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या पुणे दौर्‍याच्या नियोजनाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे.

दर वर्षी गणेशोत्सवात पुण्यातील मानाच्या पाच गणपतींसह काही प्रमुख गणेश मंडळांच्या बाप्पाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह प्रमुख नेतेमंडळी येत असतात. त्यानुसार शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री शिंदेंही पुण्यातील बाप्पाच्या दर्शनाला बुधवारी आले. मात्र, मुख्यमंत्र्यांनी शहरातील मानाची जी प्रमुख आठ मंडळे आहेत, त्यामधील फक्त सहाच मंडळांना भेट दिली, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या पुणे दौर्‍याचे असे अर्धवट नियोजन नक्की कोणी केले होते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

याबाबत शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक पदाधिकार्‍यांना विचारणा केली असता, त्यांनी मात्र मुख्यमंत्री कार्यालयाकडे शहरातील सर्व प्रमुख गणेश मंडळांची यादी पाठविली होती. असे असताना अर्धवट स्वरूपातच नियोजन दौरा आला, तसेच शिंदे गटाच्या काही प्रमुख पदाधिकार्‍यांच्या मंडळांना भेट देण्याचीसुद्धा मागणी केली होती. मात्र, त्यासाठी वेळ न मिळाल्याने या पदाधिकार्‍यांनी नाराजी व्यक्त केली. पुण्यातील पदाधिकार्‍यांनी कळवूनसुद्धा प्रमुख मंडळांच्या भेटीचे नियोजन का होऊ शकले नाही, तसेच स्थानिक पदाधिकार्‍यांना विश्वासातच घेतले जात नाही का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.

मुख्यमंत्र्यांनी सर्वच प्रमुख गणेश मंडळांच्या दर्शनाला जावे, अशी आमची अपेक्षा होती. मात्र, मुख्यमंत्र्यांची कार्यालयीन यंत्रणा आणि स्थानिक पातळीवरील पदाधिकारी यांच्यात नियोजनाचा अभाव असल्याने मुख्यमंत्री दर्शनाला येऊ शकले नसल्याचे आम्हाला सांगण्यात येत आहे.

       – पुनीत बालन, उत्सवप्रमुख, विश्वस्त, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती.

मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री आले नाहीत, त्यामुळे आम्ही नाराज आहोत. बुधवारी रात्री ते येणार असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून कळविण्यात आले होते. त्यानुसार कार्यकर्ते त्यांची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, प्रथा-परंपरेनुसार मुख्यमंत्री न आल्याने कार्यकर्त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

                                      – प्रसाद कुलकर्णी, अध्यक्ष, तांबडी जोगेश्वरी गणपती

Back to top button