शेळगाव, गोतोंडीत मुसळधार; कडबनवाडी, घोरपडवाडी, पिटकेश्वर भागात पाणीच पाणी | पुढारी

शेळगाव, गोतोंडीत मुसळधार; कडबनवाडी, घोरपडवाडी, पिटकेश्वर भागात पाणीच पाणी

शेळगाव; पुढारी वृत्तसेवा: इंदापूर तालुक्यातील शेळगाव, गोतोंडी, व्याहाळी, कडबनवाडी, घोरपडवाडी, हगारेवाडी, पिटकेश्वर भागात रविवारी (दि. 4) दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास वरुणराजाने जोरदार हजेरी लावली. शेतात, रस्त्यावर चोहीकडे पाणी साचलेले दिसून आले. ऐन गणपती गौराई सणामध्ये पावसाने सुरुवात केल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.

पावसाळ्यातील दोन महिने संपले तरी इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाने दडी मारली होती. पिकांची वाढ थांबल्याने शेतकरीवर्गात चिंता होती. जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी होता. गणरायाचे आगमन होताच रविवारी (दि. 4) दुपारी 2:30 ते 4 वाजेपर्यंत शेळगाव, गोतोंडी, व्याहाळी, कडबनवाडी, घोरपडवाडी, हगारेवाडी, पिटकेश्वर भागात पावसाने जोरदार हजेरी लावली.

पावसामुळे काही भागांत उसासह अन्य पिके पडलेली दिसून आली. शेतात, रस्त्यावर जागोजागी पावसाचे पाणी साचलेले दिसून आले. गणपती गौराईमध्ये पावसाने जोरदार सुरुवात केल्यामुळे दमदार पाऊस होऊ दे व बळीराजा सुखी होऊन दे, अशी प्रार्थना शेतकरी, महिला व गणेशभक्तांनी केली.

Back to top button