बाणेर : उड्डाणपुलाच्या कामावरून श्रेयवादाची लढाई सुरू, राष्ट्रवादीकडून उद्घाटन; खासदार सुळेंकडून पाहणी | पुढारी

बाणेर : उड्डाणपुलाच्या कामावरून श्रेयवादाची लढाई सुरू, राष्ट्रवादीकडून उद्घाटन; खासदार सुळेंकडून पाहणी

बाणेर; पुढारी वृत्तसेवा: पाषाण-सूस रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने उभारलेल्या राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाचे उद्घाटन स्थानिक नागरिक व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केले. भाजपकडून या पुलाचे उद्घाटन होणार होते. परंतु, तत्पूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी उद्घाटन केल्याने या कामाच्या श्रेयवादाला सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या उड्डाणपुलाची पाहणी करीत सत्ताधार्‍यांनी सेवा रस्त्याकडे लक्ष द्यावे, असा सल्ला दिला. राष्ट्रवादी काँग्रेसने या पुलाचे उद्घाटन केल्यामुळे या कामावरून राष्ट्रवादी व भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मागील काही दिवसांत या उड्डाणपुलाचे काम झाले असले, तरी सेवारस्ता अजूनही अपूर्ण आहे. त्यामुळे नागरिकांचा या उद्घाटनास विरोध होता. ‘सामान्य नागरिकांना ये-जा करण्यासाठी रस्ता नसल्याने काम झाल्याबरोबर उद्घाटन होणे गरजेचे असते.

परंतु, सत्ताधार्‍यांना वेळ मिळत नसल्याने उद्घाटन रखडले,’ असा टोला या वेळी सुळे यांनी लगावला. तसेच, दुसरीकडे मी केवळ कामाची पाहणी करायला आले आहे व उद्घाटन स्थानिक नागरिकांनी केल्याचेही सुळे यांनी सांगितले. या वेळी बाबूराव चांदेरे, प्रमोद निम्हण, सुषमा निम्हण, रोहिणी चिमटे, समीर उत्तरकर, सूर्यकांत भुंडे आदी उपस्थित होते.

Back to top button