पुणे : मोदकांना परदेशातही मोठी मागणी; अमेरिका, ऑस्ट्रेलियात राहणार्‍या मराठी कुटुंबांकडून मिळताहेत ऑर्डर | पुढारी

पुणे : मोदकांना परदेशातही मोठी मागणी; अमेरिका, ऑस्ट्रेलियात राहणार्‍या मराठी कुटुंबांकडून मिळताहेत ऑर्डर

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ऑस्ट्रेलिया, कॅनडा, आखाती देश, सिंगापूर अशा विविध देशांमध्ये गणेशोत्सवासाठी विविध प्रकारचे मोदक पाठविले जात आहेत. परदेशात राहणार्‍या मराठी कुटुंबीयांसाठी पुण्यातून हे मोदक पाठविले जात असून, अनेक व्यावसायिकही पुण्यातून मोदक आणि प्रसाद कुरिअरद्वारे परदेशात पाठवित आहेत. यातून त्यांचे चांगले अर्थार्जन होत आहे. उकडीच्या फ्रोजन मोदकांसह तळणीचे तसेच काजू, मावा यांच्यासह चॅकलेट, पिस्ता अशा वेगवेगळ्या प्रकारचे मोदक परदेशात रवाना होत आहेत.

गणेशोत्सवात सर्वाधिक महत्त्वाचे असतो मोदक. मागील वर्षीही मोदकांना परदेशातून चांगली मागणी होती. यंदाही मोदकांसह प्रसादाला चांगला प्रतिसाद आहे. कुरिअर कंपन्या आणि व्यावसायिक विशेष प्रकारच्या पार्सलच्या माध्यमातून हे मोदक आणि प्रसाद पाठवित आहेत. खासकरून उकडीच्या फ्रोजन मोदक सर्वाधिक प्रमाणात पाठविले जात असल्याचे महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सरपोतदार यांनी सांगितले.

सरपोतदार म्हणाले, ‘परदेशात राहणार्‍या भारतीयांकडून मोदक मागविले जात आहेत. गणेशोत्सवाच्या काही दिवसांपूर्वीपासूनच विविध प्रकारचे मोदक, खासकरून फ—ोजन मोदक पाठविण्याचे प्रमाण अधिक आहे. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, आखाती देश आदी ठिकाणाहून मोदक आणि प्रसादाला मागणी आहे. गणेशोत्सवात कुरिअरद्वारे पाठविण्यास कोणतीही अडचण येत नसल्याने मोदक पाठविण्याचे प्रमाण वाढले आहे.’ दीपक नाडकर्णी म्हणाले, ‘फ्रोजन मोदकांना दरवर्षी मागणी असते. आम्ही मोठ्या प्रमाणात परदेशात हे मोदक पाठवितो. यंदाही मागणी आहेच आणि फ—ोजन प्रकारचे मोदक परदेशात रवाना करत आहोत.’

Back to top button