खेडला भात, सोयाबीन पीक जोमदार | पुढारी

खेडला भात, सोयाबीन पीक जोमदार

भामा आसखेड; पुढारी वृत्तसेवा: खेड तालुक्याच्या पश्चिम भागात भात व सोयाबीन पिकाची वाढ जोमदार झाली आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भीमा- भामा खोरे हा भात उत्पादक पट्टा ओळखला जातो. बदलत्या काळानुसार शेतकर्‍यांनी अन्य पिकांना फाटा देऊन जास्त खर्च नसलेल्या सोयाबीन पिकाला पसंती दिल्याने या पट्ट्यात सोयाबीनचा पेरादेखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातच यंदा पावसानेदेखील चांगली साथ दिली. मुसळधार पावसामुळे ओढ्या, नाल्यांना पाणी आल्याने विहिरीच्या पाणी पातळीत वाढ झाली.

सध्या पावसाने ओढ दिल्याने भात पिकातील तण काढणे, खतांची मात्रा देणे आदी कामे सुरू आहेत. सोयाबीन पिकावर औषध फवारणी केली जात आहे. हवामानाने चांगली साथ दिल्याने दोन्ही पिकांची वाढ समाधानकारक झाली आहे. अधिकाधिक उत्पादन मिळावे यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत. किडीचा प्रादुर्भाव पिकाच्या सुरुवातीच्या काळात झाल्यास फुले, शेंगांची संख्या व दाण्यांचे वजन घटते व मोठे नुकसान होते. उपाययोजना म्हणून अंडीपुंज असलेली पाने तसेच जाळीदार पाने त्यावरील अळ्यासह गोळा करून केरोसीन मिश्रित पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा.

किडीचा प्रादुर्भाव झाल्याचे लक्षात आल्यावर शेतकर्‍यांनी पिकावर किनॉलफॉस किंवा इंडोक्झाकार्ब नाही तर क्लोरॅनट्रिनिप्रोल किंवा ट्रायझोफॉस यापैकी एक प्रतिबंधात्मक कीटकनाशक औषध पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पिकासाठी नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांना कृषी विभागाकडून औषधेदेखील दिली जातात. शेतकर्‍यांनी वेळेवर व योग्य वेळी फवारणी केल्यास अळीचा नाश होतो आणि पिकांची वाढ चांगली होऊन अधिक उत्पादन मिळते, असे आसखेड बुद्रुक विभागाच्या कृषी सहायक ज्योती राक्षे यांनी सांगितले.

Back to top button