आंबेगाव : पावसाचा झेंडूला मोठा फटका; ऐन सणासुदीत बागा सोडून दिल्या | पुढारी

आंबेगाव : पावसाचा झेंडूला मोठा फटका; ऐन सणासुदीत बागा सोडून दिल्या

आंबेगाव; पुढारी वृत्तसेवा: झेंडूच्या फुलांना यंदा पावसाचा प्रचंड फटका बसला. त्यात बाजारभावाची देखील साथ मिळाली नाही. गणेशोत्सवाचा सण सुरू झाला तरीदेखील फुलांच्या बागा कोमेजलेल्याच दिसत आहेत. झेंडूच्या बागा पावसामुळे लवकरच खराब झाल्या आहेत. त्यामुळे झेंडूच्या पिकासाठी गुंतविलेले भांडवल शेतकर्‍यांच्याच अंगावर आले आहे. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात अनेक फूल उत्पादक शेतकर्‍यांनी झेंडूच्या बागा खराब झाल्याने सोडून दिल्या आहेत.

गणेशोत्सव, नवरात्रोत्सव डोळ्यासमोर ठेवून अनेक फूल उत्पादक शेतकर्‍यांनी झेंडूचे पीक मोठ्या प्रमाणावर यंदा घेतले होते. सुरुवातीला किलोला 50 रुपये असा बाजारभाव झेंडूच्या फुलांना मिळाला. परंतु त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. सततच्या पावसाने फुले ओली झाल्याने ती सडू लागली. व्यापार्‍यांनी फुले खरेदीकडे देखील पाठ फिरवली. पावसामुळे अनेक शेतकर्‍यांच्या बागांमधील झेंडूची झाडे उन्मळून पडून खराब झाली. गुंतविलेले भांडवल आता शेतकर्‍यांच्याच अंगावर आले आहे .

कृत्रिम कापडी झेंडूचे हार, तोरण विक्रीचा देखील परिणाम
यंदा गणेशोत्सवात सर्वच बाजारपेठांमध्ये हुबेहूब दिसणारे कृत्रिम कापडी झेंडूच्या फुलांचे हार, तोरण विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर आले. त्याचे मोठमोठे गुच्छ लक्ष वेधून घेणारे आहेत, परंतु त्यांच्या किंमती तुलनेने कमी आहेत. त्यामुळे ग्राहकांनी यंदा कृत्रिम पद्धतीने तयार केलेले फुलांचे हार- तोरण खरेदी केले. त्याचाही फटका फूल उत्पादकांना बसला.

 

Back to top button