नारायणबेट पाटीवर गतिरोधक बसविण्याची मागणी; चौफुला-सुपा महामार्गावर अपघातात प्रवाशांचा जातोय बळी | पुढारी

नारायणबेट पाटीवर गतिरोधक बसविण्याची मागणी; चौफुला-सुपा महामार्गावर अपघातात प्रवाशांचा जातोय बळी

खोर; पुढारी वृत्तसेवा: दौंड तालुक्यातील चौफुला-सुपा राज्य महामार्गावरील नारायण बेट पाटी येथे गतिरोधक बसविण्याची अत्यंत गरज असून, तशी ग्रामस्थांची मागणी आहे. देऊळगावगाडा, पडवी, माळवाडी, खोर परिसरातील वरवंड येथे शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. अनेक लहान मुले नारायणबेट पाटीजवळ रस्ता ओलांडून जवळच असलेल्या विठ्ठलवाडी, माळवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जातात. माळवाडी, पडवी, विठ्ठलवाडी परिसरातील लहान मुलेही देऊळगावगाडा येथील श्री सद्गुरू माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी हा राज्य महामार्ग ओलांडून येत असतात.

या वेळी नारायणबेट पाटीजवळ चारचाकी व दुचाकी वाहनेही अतिशय वेगात असतात. लहान मुले रस्ता ओलांडताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. देऊळगावगाडाचे माजी सरपंच डी. डी. बारवकर, समाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब बारवकर, संदीप होले यांनी वेळोवेळी ही बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लक्षात आणून दिली आहे. मात्र, अद्याप हा गतिरोधकचा प्रश्न सुटला गेला नाही.
पुढील काळातील भीषण अपघात टाळण्यासाठी नारायणबेट पाटी रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी होत आहे. या बेट पाटीनजीक प्रवासी व लहान मुलांपासून ते वयोवृद्ध ग्रामस्थ नारायणबेट पाटीवर भर उन्हात उभे असतात. त्यामुळे गतिरोधकाबरोबरच प्रवाशांसाठी पिकअप शेड उभारण्याची मागणी देखील ग्रामस्थांनी केली आहे.

Back to top button