पुणे : नदीपात्रातील विसर्जन हौदांवर फुली, कायमस्वरूपी व्यवस्थेकडे दुर्लक्ष | पुढारी

पुणे : नदीपात्रातील विसर्जन हौदांवर फुली, कायमस्वरूपी व्यवस्थेकडे दुर्लक्ष

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने नदी पात्रालगतच्या विविध घाटांवर गणेश विसर्जनासाठी बांधलेल्या हौदांवर यंदा फुली मारली आहे. गणेश विसर्जनासाठी महापालिकेने कोविड काळापासून फिरत्या विसर्जन हौदांची व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे. यावर्षी 150 फिरत्या हौदांची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, कायमस्वरुपी असलेल्या व्यवस्थेकडे दुर्लक्ष करून केवळ ठेकेदाराचे खिसे भरण्यासाठी 1 कोटी 35 लाखांचा चुराडा केला जात असल्याचा आरोप होत आहे. महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी गणेश विसर्जनासाठी नदीकाठ असलेल्या विविध घाटांवर बांधिव हौद आणि शहराच्या विविध भागात लोखंडी टाक्यांची व्यवस्था केली जाते. मात्र, करोना काळात नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी महापालिकेने 2020 आणि 2021 मध्ये नदीकाठच्या घाटांवर हौद आणि लोखंडी टाक्यांवर फुली मारत फिरते विसर्जन हौदांची व्यवस्था केली होती. पहिल्या वर्षी 30 आणि दुसर्‍या वर्षी 60 फिरते विसर्जन हौद कार्यरत ठेवण्यात आले होते.

मात्र, यंदा फिरते हौद संकल्पनेला पूर्णविराम देऊन पुन्हा पूर्वी प्रमाणेच विसर्जनासाठी घाटांवरील बांधलेले हौद, लोखंडी टाक्यांची व्यवस्था केली जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, महापालिका प्रशासनाने यंदा महापालिकेची कायमस्वरुपीची विसर्जन व्यवस्था करण्यासोबतच 150 फिरते विसर्जन हौद कार्यरत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. फिरत्या हौदांसाठी 1 कोटी 35 लाखाची निविदा उघडण्यात आली आहे. प्रशासनाच्या या निर्णयावर टिका झाल्यानंतर नदी काठच्या विसर्जन हौदांवर प्रशासनाने फुली मारली आहे. दर वर्षी विसर्जन घाटांवर केली जाणारी व्यवस्था यंदा करण्यात आलेली नाही. नदीकाठच्या विसर्जन हौदांत विसर्जनासाठी येणारे गणेश भक्त नदीमध्ये मूर्ती विसर्जन करतात, म्हणून हे हौद कार्यान्वीत केले नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. तर फिरत्या हौदांचा प्रयोग फेल जावू नये, म्हणून विसर्जन हौद कार्यान्वित करण्यात आले नसल्याचा आरोप केला जात आहे.

महापालिकेने केली ही व्यवस्था
कोरोनामुळे दोन वर्षाच्या खंडानंतर यंदा मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. यासाठीची महापालिकेने शहराच्या विविध भागांत 150 फिरत्या विसर्जन हौदांची व्यावस्था केली आहे. तसेच नदीपात्र आणि परिसरात महापालिकेचे कर्मचारी, जीवरक्षक, सफाई कामगारांची नेमणूक केली आहे. विसर्जनाच्या ठिकाणी विद्युत व्यवस्था, छोटेखानी मांडवही उभारण्यात आले आहेत. या परिसरात जमा होणारा कचरा रोजच्या रोज उचलला जावा, यासाठी महापालिकेने स्वच्छता सेवक नेमले आहेत. तसेच 263 मूर्ती संकलन केंद्र व निर्माल्य संकलन केंद्र, शाडूच्या मूर्ती विसर्जित केल्यानंतरही माती संकलन केंद्र आदी व्यवस्था केली आहे.

जलस्त्रोतांमध्ये नागरिकांनी गणेशमूर्तींचे विसर्जन करू नये, यासाठी महापालिकेकडून विविध व्यवस्था करण्यात आल्या आहेत. नदीकाठच्या विसर्जन हौदांत विसर्जनासाठी येणारे गणेश भक्त नदीमध्ये मूर्ती विसर्जन करतात, ते टाळण्यासाठी यंदा नदीकाठचे हौद कार्यान्वीत केले नाहीत.
                          -आशा राऊत, उपायुक्त, घनकचरा व व्यवस्थापन विभाग.

महापालिकेची पूर्वीची विसर्जन व्यवस्था असताना, कोणीही फिरत्या हौदांची मागणी केलेली नसताना 60 वरून तब्बल 150 विसर्जन हौदांसाठी 1 कोटी 35 लाखाची निविदा काढण्यात आली. फिरत्या हौदांचा घाट केवळ ठेकेदाराचा खिसा भरण्यासाठी घेण्यात आला आहे. प्रशासनाने ठेकेदाराच्या खिशात सर्वांच्या समोर पैसे घालण्याचा प्रकार केला आहे. विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच

Back to top button