पुणे- सोलापूर महामार्गावर ३कोटी ६० लाख रुपये लुटणारे सापडले | पुढारी

पुणे- सोलापूर महामार्गावर ३कोटी ६० लाख रुपये लुटणारे सापडले

भिगवण: पुढारी वृत्तसेवा :  पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापुर जवळ गाडीवर गोळीबार करून ३ कोटी ६० लाख रुपये लुटुन धूम ठोकणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात पुणे ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (एलसीबी )ला यश आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. पोलिसांनी अजूनतरी अधिकृत दुजोरा दिला नाही. ग्रामीण पोलीसचे अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख हेच खुद्द पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्याची शक्यता आहे. २६ आँगस्ट रोजी पहाटे अवघ्या पुणे जिल्ह्याला हादरून सोडणारी व पोलीस यंत्रणेची झोप उडवणारी घटना पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर वरकुटे बुद्रुक येथे घडली होती.

स्कार्पिओ गाडीला अडवून व गोळीबार करित गाडीतील दोघांना मारहाण करीत साडेतीन कोटी लुटण्यात आले होते. सुरवातीला एवढी मोठी ही रक्कम हवालाची असल्याची चर्चा होती. मात्र ही रक्कम अंगडीया ची असल्याचे पुढे आले आहे. या रोड रॉबरीनंतर अवघी पोलिस यंत्रणा कामाला लागली होती. अभिनव देशमुख यांनी तपासासाठी पथके तैनात केली होती. त्यानुसार रात्रंदिवस याचा तपास सुरू होता. अखेर काही चोरांना अटक केल्याचे व बरीच रक्कम हस्तगत केल्याचे कळते आहे.

पकडण्यात आलेले चोरटे हे सोलापूर जिल्ह्यातील कुर्डु व इंदापुर तालुक्यातील असल्याचेही समजत आहे. या लुटीत दहाहुन अधिक चोरांचा समावेश असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. रक्कम लुटल्यानंतर यातील काही चोरटे गुजरातला फिरायला गेले होते मात्र त्यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आल्याचे कळते. असे असले तरी या गंभीर घटनेबाबत पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख हे पत्रकार परिषद घेऊन अधिकृत माहिती देण्याची शक्यता आहे.

Back to top button