पुणे : गटार बुजल्याने सांडपाणी रस्त्यावर | पुढारी

पुणे : गटार बुजल्याने सांडपाणी रस्त्यावर

वाफगाव, पुढारी वृत्तसेवा : शिरोली फाटा (ता. खेड) ते गावठाण रस्त्याच्या बाजूला असलेली गटार योजना बुजल्याने परिसरातील सांडपाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या ठिकाणी लवकरात लवकर नवीन गटार योजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

शिरोली ग्रामपंचायतीजवळून शिरोली फाटा ते मांजरेवाडी असा दोन ते अडीच किलोमीटरचा रस्ता आहे. या रस्त्याचे काही अंतरापर्यंत काँक्रिटीकरण करण्यात आले. दरम्यान, काहींनी रस्त्याच्या कडेला बांध घातल्याने गटार योजना बंद झाली. त्यामुळे या रस्त्यावर सतत सांडपाणी वाहत आहे.

दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. या रस्त्यालगत पुढे स्मशानभूमी आहे तसेच जाखमाता मंदिर आहे. तेथे मोठ्या संख्येने भाविक येत असतात. मांजरेवाडी परिसरातून चाकण औद्योगिक क्षेत्रात कामासाठी अनेक कामगार जातात. या सर्वांना सांडपाण्याचा त्रास होत आहे. त्यामुळे हा रस्ता रुंद करून लवकरात लवकर गटार योजना सुरू करावी, अशी मागणी माजी सरपंच रवींद्र सावंत यांनी केली आहे.

रस्त्याच्या कडेला असलेले गटार स्थानिक नागरिक व शेतकर्‍यांनी बुजवल्याने गटार योजना बंद झाली. याबाबत ग्रामस्थांनी तक्रारी केल्या आहेत. लवकरात लवकर 15 वा वित्त आयोग व जिल्हा परिषदअंतर्गत निधीतून बंदिस्त गटार योजना करणार आहे.

                                  – एस. आर. सरपाते, ग्रामसेवक, शिरोली फाटा

Back to top button