पुणे : बूस्टरसाठी ‘कॉर्बेव्हॅक्स’कडे पाठ; पंधरा दिवसांत कमी प्रतिसाद | पुढारी

पुणे : बूस्टरसाठी ‘कॉर्बेव्हॅक्स’कडे पाठ; पंधरा दिवसांत कमी प्रतिसाद

पुणे; पुढारी वृत्तसेवा: बूस्टर डोस म्हणून कॉर्बेव्हॅक्सची लस घेण्यास मान्यता देण्यात आली. मात्र, बहुतांश नागरिकांनी पहिला आणि दुसरा डोस कोव्हिशिल्ड अथवा कोव्हॅक्सिनचा घेतला आहे. त्यामुळे कॉर्बेव्हॅक्सबाबत अद्याप संभ्रम आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये 18 वर्षांवरील 500 हून कमी नागरिकांनी कॉर्बेव्हॅक्स लसीला पसंती दिली आहे. कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनच्या तुलनेत कॉर्बेव्हॅक्स लसीचे डोस वाया जाण्याचे प्रमाण जास्त आहे. कॉर्बेव्हॅक्स लसीची व्हायल 20 डोसची असल्याने एकाच वेळी केवळ 10-12 नागरिक आल्यास व्हायल फोडावी लागते आणि उर्वरित डोस वाया जातात. काही दिवसांपूर्वी कोव्हिशिल्ड लसीचा तुटवडा निर्माण झाला होता.

त्यामुळे कॉर्बेव्हॅक्सला बूस्टर डोस म्हणून परवानगी देण्यात आली. ज्या नागरिकांनी कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्यांना 12 ऑगस्टपासून हैदराबादच्या बायोलॉजिकल ईद्वारे विकसित करण्यात आलेल्या कॉर्बेव्हॅक्स लस घेण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली. दुसरा डोस घेऊन 6 महिने किंवा 26 आठवडे झालेल्या नागरिकांना बूस्टर डोस दिला जात आहे. मात्र, महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर 15 दिवसांत 500 हून कमी नागरिकांनी कॉर्बेव्हॅक्सचा डोस घेतला आहे. शहरातील 68 लसीकरण केंद्रांवर 12 ते 14 वयोगटांतील मुलांना कॉर्बेव्हॅक्सचे लसीकरण केले जात आहे.

Back to top button