कडूसमध्ये अण्णा भाऊ साठे यांचे सभागृह बांधणार: आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे आश्वासन | पुढारी

कडूसमध्ये अण्णा भाऊ साठे यांचे सभागृह बांधणार: आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे आश्वासन

कडूस; पुढारी वृत्तसेवा: आपल्या साहित्यातून उपेक्षितांच्या समस्यांना वाचा फोडणारे, कष्टकर्‍यांच्या हक्कासाठी नेहमीच झगडणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे कडूस गावात भव्य सभागृह बांधणार असल्याचे प्रतिपादन आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले.
कडूस (ता. खेड) येथे ग्रामपंचायत, दलित स्वयंसेवक संघ महाराष्ट्र राज्य आणि संभाजी ब्रिगेड, खेड तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वसाहित्यिक साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या 102 व्या जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी ते बोलत होते.

आमदार दिलीप मोहिते पाटील आणि ज्येष्ठ समाज बांधवांच्या हस्ते अण्णा भाऊंच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात व वाजंत्री स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. सकाळी अण्णा भाऊंच्या प्रतिमेची ढोल-ताशा व विविध वाद्याच्या गजरात भव्य मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी प्राध्यापक डॉ. सुहास नाईक, रमेश राक्षे, कैलास मुसळे यांचे व्याख्यान झाले. रवींद्र गायकवाड, प्रकाश देशनेहेरे, बबन पाटोळे, तुकाराम ढमाले आदींसह विविध मान्यवरांचा यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

या वेळी सरपंच निवृत्ती नेहेरे, उपसरपंच लता ढमाले, माजी उपसरपंच कैलास मुसळे, पंडित मोढवे, प्रताप ढमाले, दामोधर बंदावणे, विविध राजकीय पक्ष, संस्था-संघटना व ग्रामपंचायतिचे पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिनाथ शेंडे यांनी केले. सूत्रसंचालन अनिकेत धायबर यांनी केले, तर आभार बारकू गायकवाड यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दलित स्वयंसेवक संघ महाराष्ट्र राज्य व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे कडूस मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

Back to top button