शेळगाव : मुलींवरील लैंगिक अत्याचार रोखण्यास कडक उपाययोजना हव्यात | पुढारी

शेळगाव : मुलींवरील लैंगिक अत्याचार रोखण्यास कडक उपाययोजना हव्यात

संतोष ननवरे

शेळगाव : जिल्हा परिषदेच्या तसेच विविध संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये दिवसेंदिवस अल्पवयीन मुलींवर होत असलेले लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी शिक्षण विभागाने व संबंधित शाळेने कडक उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे, अशी भावना इंदापूर तालुक्यातील पालक व ग्रामस्थांमधून व्यक्त होऊ लागली आहे. नुकतेच शिक्षण क्षेत्राला व शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे घडली. या घटनेमुळे अल्पवयीन मुलींमध्ये व त्यांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मनावर होत आहे. भिगवणसारखी घटना आपल्या शाळेत व गावात घडू नये म्हणून संबंधित जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापक शिक्षकांनी तसेच शाळा व्यवस्थापन समितीने मुलींमध्ये याविषयी जनजागृती करणे गरजेचे आहे. कडक उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशी मागणी होऊ लागली आहे.

महिला पोलिसांचे निर्भया पथक अ‍ॅक्शन मोडमध्ये येणे गरजेचे
महिला व मुलींवरील होत असलेले अत्याचार व छेडछाड रोखण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी महिला पोलिसांच्या निर्भया पथकाची स्थापना केली. मात्र, इंदापूर तालुक्यात ग्रामीण भागात या निर्भया पथकाची कामगिरी दिसून आली किंवा शाळेमध्ये मुलींना मार्गदर्शन केल्याचे दिसून आले नाही. इंदापूर तालुक्यातील शाळेतील व महाविद्यालयांतील मुलींवर होत असलेले लैंगिक अत्याचार व छेडछाड रोखण्यासाठी इंदापूर तालुक्यात असलेल्या महिला पोलिसांच्या निर्भया पथकांनी अ‍ॅक्शन मोडमध्ये येणे गरजेचे आहे.

Back to top button