फुरसुंगी : खाणीच्या जागी हवे पक्षी अभयारण्य | पुढारी

फुरसुंगी : खाणीच्या जागी हवे पक्षी अभयारण्य

फुरसुंगी; पुढारी वृत्तसेवा: तुकाईटेकडीवरील बंद खाणीची जागा वापराअभावी अतिक्रमण व अवैध धंद्यास पोषक ठरत आहे. पक्षी अभयारण्य व वॉटर पार्कसाठी ही जागा सोयीस्कर असून जिल्हाधिकार्‍यांनी पर्यटनाच्या दृष्टीने पुणे महापालिकेस अभयारण्य व वॉटर पार्क उभारण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. तुकाईटेकडीवरील गायरान जागेत 70 ते 80 फूट खोल व 400 फूट लांबीची ही खाण आहे. या खाणीला संरक्षक भिंत नसल्याने ती धोकादायक झाली आहे. सद्यस्थितीत ही जागा जिल्हाधिकार्‍यांच्या ताब्यात असून या ठिकाणी आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. तसेच, याठिकाणी अनुचित प्रकारही घडत आहेत. काही ठिकाणी अवैध धंदेही सुरू असल्याचे पाहावयास मिळते.

खाणपरिसरात मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचा वावर असतो. पक्षी अभयारण्यासाठी ही खाणीची जागा योग्य असून याठिकाणी वॉटर पार्क प्रकल्पही उभारता येऊ शकतो. आजुबाजुला झाडे लावून हा परिसर सुशोभित केल्यास या खाणीचा जागेचा सुयोग्य वापर होऊ शकतो. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी परवानगी दिल्यास मनपातर्फे ही जागा ताब्यात घेऊन या परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास होऊ शकतो. यासंदर्भात मागील वर्षी पालिका अधिकार्‍यांनी खाण परिसराला भेट देऊन या जागेची पाहणी केली होती. याबाबत परवानगी मिळणे बाबत येथील रहिवाश्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनसुद्धा दिले होते. मात्र अद्याप याबाबत पुढील कार्यवाही न झाल्याने हा विषय तुर्तास मागे पडला असल्याचे दिसून येत आहे.

 

 

 

 

Back to top button