पुणे : खेड, आंबेगाव, जुन्नरमध्ये अडकली पुणे-नाशिक रेल्वे | पुढारी

पुणे : खेड, आंबेगाव, जुन्नरमध्ये अडकली पुणे-नाशिक रेल्वे

पुणे, सुषमा नेहरकर-शिंदे : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गासाठी आवश्यक जमिनीची मोजणी पूर्ण होऊन थेट खरेदीने भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये सर्वाधिक किचकट सातबारे असलेल्या हवेली तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक खरेदीखते करत सुमारे 8 ते 9 हेक्टर जमीन रेल्वेच्या ताब्यात देण्यात आली आहे. हवेली तालुक्यातून निघालेली पुणे-नाशिक रेल्वे खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात अडकली आहे.

अधिकार्‍यांच्या वेळ काढूपणामुळे खेड तालुक्यात नावाला सुरुवात म्हणून एक-दोन खरेदीखते केली असून, जुन्नर-आंबेगाव तालुक्यात अद्याप एकही खरेदीखत झालेले नाही. सहा महिन्यांपूर्वी गती पकडलेला प्रकल्प पुन्हा ठप्प झाला आहे. पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारा पुणे- नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यातील जमीन संपादित करण्यात येणार आहे. यासाठी एकट्या पुणे जिल्ह्यात हवेली, पुणे शहर, खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील 54 गावांमध्ये खासगी शेतकर्‍यांची सुमारे 457.64 हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील 54 गावांपैकी 42 गावांमध्य जमिनीची मोजणी पूर्ण झाली आहे.

अधिकाऱ्यांचा वेळकाढूपणा

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या पुणे-नाशिक रेल्वेमार्गसाठी आवश्यक जमिनीची मोजणी केवळ आठ महिन्यांत पूर्ण होऊन जानेवारी महिन्यात प्रत्यक्ष खरेदीखत देखील सुरुवात झाली. हवेली तालुक्यात पहिल्या 36 गुंठ्यांच्या खरेदीखताला तब्बल 1 कोटी 73 लाख रुपये देण्यात आले. रेडीरेकनरच्या पाचपट मोबदला मिळत असल्याने अनेक शेतकरी प्रशासनाच्या मागे लागून आपल्या जमिनी घेण्यासाठी पाठपुरावा करत आहेत, परंतु खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात स्थानिक अधिकार्‍यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने व अधिकारी वेळकाढूपणा करत असल्याने खरेदीखते रखडली असल्याची तक्रार बाधित शेतकरी करत आहेत.

हवेली तालुक्यात आतापर्यंत 29 खरेदीखते झाली असून, शेतकर्‍यांना तब्बल 191 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. खेड तालुक्यात आतापर्यंत 8 खरेदीखत होऊन 11 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 21 गावे खेड तालुक्यातील असून, प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी भूसंपादनाचे काम गतीने पूर्ण करण्याची गरज आहे.

लोकांना विश्वासात घेऊन जलदगतीने खरेदीखत करावी, पुणे जिल्ह्याच्या विकासाठी पुणे-नाशिक रेल्वे हा महत्त्वपूर्ण प्रकल्प ठरणार आहे. यासाठी जमीन मोजणी पूर्ण होऊन खरेदीखत सुरू झाली आहेत. शेतक-यांना चांगला दर मिळणार असेल तर प्रशासनाने लोकांना विश्वासात घेऊन जलद गतीने खरेदीखत करून अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पाला गती द्यावी.

                                       – अतुल देशमुख, भाजप नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य

जमीन संपादित होणारी गावे

  • 54गावे पुणे शहर – 3 हवेली – 12खेड – 21आंबेगाव – 10 जुन्नर – 8
  • मोजणी किती गावांमध्ये पूर्ण झाली – 42
  • आता एकूण खरेदीखत : हवेली -29, खेड – 8
  • एकूण पैसे वाटप : 202 कोटी

Back to top button