पुणे : पशुखाद्यदरात वाढ; दूध उत्पादकांच्या दूध दराचे काय? | पुढारी

पुणे : पशुखाद्यदरात वाढ; दूध उत्पादकांच्या दूध दराचे काय?

वाल्हे, समीर भुजबळ : उन्हाळा सुरू होताच दुधाच्या खरेदीदरात प्रतिलिटर 2 ते 3 रुपये दरवाढ करण्यात आली होती. त्याचवेळी पशुखाद्यातही मोठी दरवाढ करण्यात आली होती. उन्हाळा संपताच दूध खरेदीदरात पुन्हा 3 रुपयांनी कपात करण्यात आली. मात्र, पशुखाद्यातील दरवाढ तशीच नियमित करण्यात आली होती.

मागील काही दिवसांपासून ग्राहकांना विक्री होणार्‍या दुधाच्या दरात 2 रुपये वाढ करण्यात आली. खरेदीदरात मात्र कोणतीही दरवाढ न करता पशुखाद्याच्या किमती मात्र प्रतिपोत्यामागे 50 रुपये दरवाढ केल्याने शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय करणार्‍या शेतकरीवर्गापुढे अडचणींचा आलेख वाढतच असल्याने शेतकरीवर्गाने जगायचे तरी कसे? असा प्रश्न आहे.

दुग्धव्यवसायातील गोचीड कोण?

सर्वसामान्य ग्राहकांना म्हशीच्या दुधास 68 रुपये प्रतिलिटर मोजावे लागतात, तर शेतकर्‍यांच्या हातावर लिटरमागे 45 रुपये टेकवून मधला 22 रु. प्रतिलिटर नफा कमावला जातो, तर गायीच्या दुधासाठी ग्राहकांकडून 50 ते 52 रुपये घेतले जातात. त्याचवेळी दूध उत्पादकांना मात्र प्रतिलिटर 33 रुपये मिळतात. म्हशीच्या प्रतिलिटर दुधामागे 22 रुपये, गायीच्या प्रतिलिटर दुधामागे 17 रुपये नफा कमावणारी व्यवस्था म्हणजेच या व्यवस्थेला लागलेली शोषण करणारी ‘गोचीड’च आहे.

गोचीड ज्याप्रमाणे गायी, म्हशी, गुराढोरांच्या अंगावर राहते, रक्त शोषते; अशाच रक्तपिपासू कीटकाप्रमाणे खासगी डेअरी, दूध संघ ही प्रचंड नफेखोरी करून शेतकर्‍यांचे शोषण करीत आहेत. दूध उत्पादकांची लूट करणारे हे गोचीडपेक्षाही घातक आहेत. गोचीड फक्त गुराढोरांचे रक्त शोषते, तर दुधातील हे नफेखोर गुराढोरांसहित त्यांच्या पालनकर्त्या शेतकर्‍यांचेसुद्धा शोषण करीत आहेत, असा संताप दूध उत्पादक शेतकरीवर्गाकडून जबाबदार शासनाविरोधात व्यक्त होत आहे.

दूध दरकपात

कोणतेही सबळ कारण नसताना खासगी दूध संघांनी गायीच्या दूध दरात पावसाळ्याच्या तोंडावर 3 रुपयांनी कपात केल्याने शेतकर्‍यांच्या दुधाचा दर 36 रुपयांवरून 33 रुपये प्रतिलिटरवर आला आहे. शेतकर्‍यांसाठी दूध दरात ही कपात झाली असली, तरी दूध ग्राहकांना मात्र 2 रुपये वाढवून आता दर 66 ते 68 रुपये प्रतिलिटर दराने विकत घ्यावे लागते. प्रचंड नफेखोरी करून मधले दलाल मालामाल, तर शेतकरी कंगाल होत आहेत.

Back to top button