पुणे : मलेरियाची लस अधिक परिणामकारक बनवणार: ‘सिरम’चे सीईओ आदर पूनावाला यांची माहिती | पुढारी

पुणे : मलेरियाची लस अधिक परिणामकारक बनवणार: ‘सिरम’चे सीईओ आदर पूनावाला यांची माहिती

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘नोव्होव्हॅक्सच्या मदतीने सध्याची मलेरियाची लस अधिक परिणामकारक आणि सर्वोत्तम ठरणार आहे. फ्लूच्या लसीबाबतही अमेरिकेशी बोलणी सुरू आहे,’ अशी माहिती सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी दिली.
भारतात तयार करण्यात आलेल्या नोव्हॅक्सोव्हिड लसीला अमेरिकेत वितरणासाठी मान्यता मिळाली आहे, असेही त्यांनी सांगितले.
‘सिरम’मध्ये अमेरिका-भारत आरोग्यविषयक सहयोगाच्या सन्मानार्थ विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी आदर पूनावाला, यू. एस. मिशन इनचार्ज पॅट्रिशिया लॅसिना, अमेरिकेचे मुंबईतील महावाणिज्यदूत माइक हॅन्की, नोव्हावॅक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टॅनली सी. अर्क, एचएचएस हेल्थ अटॅच डॉ. प्रीथा राजारामन आदी उपस्थित होते. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनालयाने अलीकडेच नोव्हॅक्सोव्हिडला मान्यता दिल्याने सिरम इन्स्टिट्यूट हे अमेरिकेतील लस बाजारपेठेत प्रवेश मिळविणारे पहिले भारतीय उत्पादक ठरले आहे. ‘सिरम’तर्फे निर्मित नोव्हाव्हॅक्स लसीचे सुमारे 35 लाख डोस अमेरिकेत पाठविण्यात आले आहेत.

या लसीचे नोव्हाव्हॅक्सकडून नोव्हॅक्सोव्हिड या नावाने तर सिरमकडून कोव्हाव्हॅक्स या नावाने मार्केटिंग करण्यात आले आहे. हे उत्पादन पुण्यात करण्यात आले आहे. युरोप, ऑस्ट्रेलिया व अमेरिकेसारख्या नियंत्रित बाजारपेठा आणि जगातील अनेक देशांमध्ये ही लस निर्यात करण्यात आली आहे. पॅट्रिशिया लॅसिना म्हणाल्या, ‘अमेरिका आणि भारताची भागीदारी सध्याच्या काळातील आव्हाने हाताळण्यासाठी महत्त्वाची आहे. आरोग्य चांगले राखण्यासाठी दोन्ही देशांमधील भागीदारीची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.’

स्टॅनली सी. अर्क म्हणाले, ‘लसीची परिणामकारकता सिद्ध झाली. क्लिनिकल ट्रायलमध्ये लस 91 टक्के परिणामकारक असल्याचे दिसून आले. भविष्यात विषाणूमध्ये संभाव्य बदल झाल्यास तेव्हाही लस परिणामकारक ठरू शकेल. निर्धार, कल्पकता व कौशल्य यांची सांगड घालण्यासाठी नोव्हाव्हॅक्स आणि सिरम इन्स्टिट्यूट ही भागीदारी वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.’

‘बूस्टर’बाबत मूल्यमापन
नोव्हाव्हॅक्स कोव्हिड-19 लसीचा इतर आजारांवरील परिणाम जाणून घेऊन तसेच किशोरवयीन मुलांना, तसेच 18 वर्षांपुढील नागरिकांना बूस्टर म्हणून देता येईल का, या संदर्भात मूल्यमापन सुरू आहे. या व्यतिरिक्त कोव्हिड-सीझनल इन्फ्लुएंझा संयुक्त लसीचे मूल्यमापन करत आहे. या लसीमध्ये रोगप्रतिकारक प्रतिसाद वाढविण्यासाठी आणि निष्प्रभ प्रतिपिंडांना चालना देण्यासाठी नोव्हावॅक्सच्या मालकीचे सॅपोनिन-आधारित मॅट्रिक्स-एम सहायक समाविष्ट करण्यात आले आहे.

Back to top button