पुणे : खातेवाटपाला उशीर का? दोघांनाच माहीत: अजित पवार यांचा टोला | पुढारी

पुणे : खातेवाटपाला उशीर का? दोघांनाच माहीत: अजित पवार यांचा टोला

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही लवकरात लवकर खातेवाटप करणार, असा आवडीचा शब्द वापरत आहेत. मात्र, खातेवाटपाला उशीर का? हे दोघांनाच माहिती…’ असा टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शनिवारी लगावला. शिंदे गट व भाजपच्या सरकार स्थापनेबाबत जनतेच्या मनात नाराजी असून, असे फोडाफोडीचे राजकारण कोणालाच आवडलेले नाही, असेही त्यांनी सांगितले. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (पीडीसीसी) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

फोडाफोडीच्या राजकारणाला जनता थारा देणार नसल्याचे नमूद करून ते म्हणाले, ‘मूळ शिवसैनिकांनी आमदारांना निवडून आणण्याचे काम केले, असे लोकही नाराज आहेत. आजवर ज्यांनी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला, अशा लोकांना मुदत संपेपर्यंत यश आले. नंतर ते निवडणुकांमध्ये निवडून आले नाहीत. छगन भुजबळ, नारायण राणे यांच्या काळात तसे घडले आहे. एकनाथ शिंदे यांच्याबाबतही घडेल असे वाटत असताना 200 जागा निवडून आणू असे शिंदे म्हणत आहेत. आता बघू, किती जागा निवडून येतात. ’

बिहारमधील सत्तांतरावर ते म्हणाले, ‘नितीशकुमार यांच्या मनात काय आले, हे त्यांनाच माहीत. मात्र, वेगवेगळ्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत. मतदार कोणाला कौल देतील हे नंतरच कळेल.’ निर्मला सीतारामन यांच्या बारामती दौ-याबाबत पवार म्हणाले, ‘बारामती तालुक्याचा आमदार या नात्याने अर्थमंत्र्यांचे मी स्वागत करतो. बारामतीत आम्ही काय काम केले, हे पाहण्यासाठी पंतप्रधान, राष्ट्रपती, अरुण जेटली येऊन गेले आणि त्यांनी कौतुक केले आहे. त्यांच्यावर भाजपने जबाबदारी दिली असली, तर मीसुध्दा वाराणसीची जबाबदारी घेऊ शकतो.’

प्रभागरचना बदलाबाबत ते म्हणाले, ‘सुप्रीम कोर्ट काय आदेश देईल त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी होईल. मात्र, राज्य सरकारला तत्काळ निवडणुका नको आहेत. त्यांना वेळ हवाय, कारण सध्याचे हे वातावरण निवडणुकांना पोषक नाही. त्यांनी सहकारी संस्थांच्या निवडणुकाही सप्टेंबरअखेर पुढे ढकलल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना नगरविकासमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनीच त्यावेळी प्रभागाचा निर्णय घेतला होता. आता ते मुख्यमंत्री झाल्यावर हा निर्णय बदलत आहेत, मग आता तुमच्यावर दबाब आहे काय? यावर आम्ही सभागृहात प्रश्न उपस्थित करू, असे म्हणाले.’

पुण्याच्या पाण्यात वाढलेल्या जिवाणूंच्या प्रमाणाबाबत पवार म्हणाले, ‘खडकवासला धरण परिसरातील गावांमधून जे सांडपाणी धरणात मिसळते, त्या सांडपाण्यावर मैलापाणी शुध्दीकरण केंद्रात प्रक्रिया करून ते पाणी शेतीला उपयोगात आणावे, अशा सूचना जिल्हा परिषदेला आमच्या सरकारने दिल्या होत्या. आता यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाने लक्ष घालावे.’

Back to top button