भोसरी : केंद्र सरकारच्या धोरणामुळेच हर घर महागाई : सतीश काळे | पुढारी

भोसरी : केंद्र सरकारच्या धोरणामुळेच हर घर महागाई : सतीश काळे

भोसरी : केंद्र सरकारने हर घर तिरंगा अभियान हाती घेतले आहे. त्याचे स्वागतच आहे. मात्र, त्यांच्या चुकीच्या धोरणामुळेच हर घर महागाई वाढली आहे, अशी टीका संभाजी ब्रिगेड पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी केली आहे. काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे, की केंद्र सरकारने हर घर तिरंगा हे अभियान राबविले आहे. त्यानुसार, प्रत्येकाने घरावर तिरंगा फडकविण्याचे आवाहन केले आहे. हा उपक्रम स्वागतार्हच आहे. देशासाठी शूरवीरांसारखे प्राणदेखील पणाला लावले पाहिजेत. या मताचे सगळेच आहोत. मात्र, या अभियानाबरोबरच देशातील जनतादेखील सुख, समाधानाने कशी राहील याचीदेखील काळजी घेणे गरजेचे आहे.

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे जनता अस्वस्थ दिसत आहे. कामगार धोरणात बदल केल्यामुळे पिंपरी चिंचवडसह देशभरातील कामगार रस्त्यावर आले आहेत. सरकारी नोकरीचे खासगीकरण झाल्याने अनेकांना नोकरीची सुरक्षितता नाही. त्यातच महागाईने उच्चांक गाठला आहे. पेट्रोल, डिझेलचे भाव शंभरीपार गेले आहेत. जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावल्याने जगणे मुश्कील झाले आहे. सध्या हर घर नोकरी, शिक्षण, मोफत आरोग्य सुविधा, महागाई कमी करणे गरजेचे आहे. अन्यथा देश वाचविण्यासाठी केंद्र सरकारच्या धोरणाला विरोध करण्यासाठी जनताच रस्त्यावर येईल, असा इशारा काळे यांनी दिला.

Back to top button