पुणे : आदिवासींची शासकीय कामे रेंगाळली | पुढारी

पुणे : आदिवासींची शासकीय कामे रेंगाळली

मंचर, पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागामधील 30 गावांत काढलेल्या जनसंवाद पदयात्रेदरम्यान नागरिकांची शासकीय दरबारी विविध कामे रेंगाळल्याचे समोर आले. घोडेगाव येथील शासकीय कार्यालयात जाऊन ही कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे किसान सभेच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त व जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील आदिवासी भागातील तीसपेक्षा अधिक गावांतून पदयात्रा सुरू आहे. याअंतर्गत प्रत्येक गावात संविधान उद्देशपत्रिकेचे वाचन होत आहे. किसान सभा आंबेगाव तालुका समिती, आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच व एस. एफ. आय. आंबेगाव तालुका समिती यांच्या वतीने ही पदयात्रा सुरू करण्यात आली आहे.

मागील दोन दिवसांपासून या पदयात्रेने सुमारे 40 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पार केले आहे. या वेळी आदिवासी भागातील विविध धोरणात्मक प्रश्नांवर लोकांशी संवाद साधण्यात येत आहे. तसेच पेसा, वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी योग्य ते मार्गदर्शनही करण्यात येत आहे. ही पदयात्रा गावात पोहचल्यावर गावातील ग्रामस्थांना सोबत घेऊन महापुरुषांना अभिवादन करण्यात येत आहे. त्यानंतर संविधान उद्देशपत्रिकेचे वाचन करून त्यावर चर्चा केली जात आहे.

आहुपे व कोंढवळ परिसरातून पदयात्रा सुरू झाली असून, स्थानिक नागरिकांचा या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्थानिक नागरिक आपले विविध मूलभूत प्रश्न या वेळी संघटनेच्या पदाधिकार्‍यांपुढे मांडत आहेत. किसान सभेचे आंबेगाव तालुकाध्यक्ष कृष्णा वडेकर, उपाध्यक्ष राजू घोडे, सचिव अशोक पेकारी, देविका भोकटे, एस. एफ. आय.चे अविनाश गवारी, दीपक वाळकोली, समीर गारे यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा सुरू आहे.

Back to top button