पुणे : ‘सीईटी’साठी लाखांवर विद्यार्थी उपस्थित; सीईटी सेलची माहिती | पुढारी

पुणे : ‘सीईटी’साठी लाखांवर विद्यार्थी उपस्थित; सीईटी सेलची माहिती

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘राज्याच्या सीईटी सेलतर्फे इजिनिअरिंग पदवी प्रवेशांसाठी घेण्यात येणारी ‘सीईटी’ 5 ऑगस्टपासून सुरू झाली. त्यातील ‘पीसीएम’ प्रकारात घेण्यात आलेल्या ‘सीईटी’साठी तब्बल एक लाखांवर विद्यार्थ्यांची उपस्थिती होती,’ अशी माहिती सीईटी सेलच्या वतीने देण्यात आली. इंजिनिअरिंग प्रवेशासाठी पीसीएम आणि पीसीबी अशा दोन ग्रुपमध्ये विद्यार्थ्यांची सीईटी घेण्यात येणार आहे. यातील पीसीएम ग्रुपची परीक्षा सध्या राज्यातील 170 केंद्रांवर सुरू आहे.

गेल्या तीन दिवसांत 1 लाख 28 हजार 357 विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी वेळ देण्यात आली होती. त्यापैकी 1 लाख 5 हजार 612 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर 22 हजार 745 विद्यार्थी परीक्षेसाठी अनुपस्थित राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. परीक्षेसाठी साधारण 82.28 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती असल्याचे दिसून आले आहे. ‘सीईटी’च्या इतरही परीक्षा टप्प्याटप्प्याने सुरू झाल्या असून, ऑगस्ट महिन्यात होणार्‍या परीक्षांसंदर्भातील अधिक माहितीसाठी सीईटी सेलच्या https://cetcell.mahacet.org/ या वेबसाइटवर संपर्क साधत राहा, असे आवाहन करण्यात आले.

 

Back to top button