पुणे : त्या आवाजाने आमची पिढी भारावली; किशोर कुमार यांच्याबद्दल डॉ. पी. डी. पाटील यांची भावना | पुढारी

पुणे : त्या आवाजाने आमची पिढी भारावली; किशोर कुमार यांच्याबद्दल डॉ. पी. डी. पाटील यांची भावना

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘किशोर कुमार यांच्या गायनाने आमची पिढी भारावून गेली होती आणि आजही त्यांचे गाणे ऐकल्यावर तीच स्थिती होते,’ अशा शब्दांत दिवंगत ज्येष्ठ गायक किशोर कुमार यांच्याविषयीच्या भावना पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी व्यक्त केल्या. संवाद, पुणे आणि महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणीतर्फे किशोर कुमार यांच्या जन्मदिनानिमित्त गायक जितेंद्र भुरुक यांना डॉ. पी.डी. पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र आणि पुणेरी पगडी देऊन गौरविण्यात आले.

त्या वेळी डॉ. पाटील बोलत होते. सत्कारानंतर भुरुक यांनी किशोर कुमार यांच्या गीतांचा कार्यक्रम सादर केला. प्रसारिणीचे अध्यक्ष सचिन ईटकर, संवाद, पुणे संस्थेचे सुनील महाजन, कर्नल ललित राय, रवींद्र डोमाळे, युवराज शहा आदी उपस्थित होते. डॉ. पाटील म्हणाले, ‘भुरुक यांनी किशोरजींच्या आवाजाची लकब उचलून किशोरजींच्या आवाजाचा पुनर्प्रत्ययाचा अनुभव दिला.’ धनश्री हेबळेकर यांनी सूत्रसंचालन केले. किशोर कुमार यांची गाणी सादर करून रसिकांची मने जिंकणारे भुरुक अन् साथ देणारा वाद्यवृंद या वातावरणात बालगंधर्व रंगमंदिरात रसिक मंत्रमुग्ध झाले.

Back to top button