पुणे : जेजुरीत मुख्यमंत्र्यांनी घेतले खंडोबाचे दर्शन | पुढारी

पुणे : जेजुरीत मुख्यमंत्र्यांनी घेतले खंडोबाचे दर्शन

जेजुरी, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे कुलदैवत व बहुजन समाजचे लोकदैवत असणार्‍या जेजुरीच्या खंडोबा देवाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (दि. 2) सायंकाळी दर्शन घेतले. भंडारा उधळून मंदिरात धार्मिक विधी केले. या वेळी श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा जेजुरी गडावर सन्मान करण्यात आला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सायंकाळी सहा वाजता जेजुरी शहरात आगमन झाले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्री देवता लिंग कडेपठार ट्रस्टच्या वतीने कडेपठारावरील खंडोबा मंदिराच्या शिखरावर बसविण्यात येणार्‍या कलशाचे पूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
जेजुरी गडावर जेजुरी देवसंस्थान, जेजुरी नगरपालिकेच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी मंत्री विजय शिवतारे यांनी श्री खंडोबा देवाचे दर्शन घेतले. दर्शनानंतर भंडारा उधळून धार्मिक विधी करण्यात आले. जेजुरी गडावरील 40 किलो वजनाची ऐतिहासिक तलवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचलली. जेजुरी देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त तुषार सहाने, विश्वस्त संदीप जगताप, शिवराज झगडे, पंकज निकुडेपाटील, राजकुमार लोढा प्रसाद शिंदे, अशोकराव संकपाळ यांनी या वेळी मुख्यमंत्र्यांचा श्री खंडोबा देवाचा फोटो देऊन सन्मान केला.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, माजी मंत्री विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्र्यांना जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याविषयी माहिती दिली. जेजुरी शहरात शिवसेना, भाजपा, कडेपठार देवसंस्थानच्या वतीनेही मुख्यमंत्र्यांचा सन्मान करण्यात आला.
या वेळी कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. मनोज लोहिया, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी विलास वहाने, प्रांत, तहसीलदार आदी उपस्थित होते.

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी भरघोस निधी

जेजुरी शहरात कलशपूजना वेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “राज्यात चांगला पाऊस होऊ दे. राज्य सुजलाम् सुफलाम् होऊन समृद्धी येऊ दे. राज्याचा सर्वांगीण विकास होऊ दे. राज्यातील साडेबारा कोटी जनता सुखी होऊ दे, अशी प्रार्थना आपण श्री खंडोबादेवाला केली आहे.” पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, ‘जेजुरीचा खंडोबा हे लाखो भाविकांचे कुलदैवत आहे, श्रद्धास्थान आहे. येथील प्राचीन मंदिराच्या विकासासाठी, भाविकांच्या सोयीसुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही.’

Back to top button