पिंपरी : झेंड्यांसाठी महापालिका प्रशासनाची धावाधाव | पुढारी

पिंपरी : झेंड्यांसाठी महापालिका प्रशासनाची धावाधाव

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने 3 लाख तिरंगा झेंडे खरेदी करण्यात येत आहेत. ते कापडी झेंडे गुजरात राज्यात तयार केले जात असून, देशभरातून मोठी मागणी असल्याने त्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. झेंडे मिळविण्यासाठी पालिका प्रशासनाला धावाधाव करावी लागत आहे. भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंग हा उपक्रम महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत पालिका 3 लाख झेंडे खरेदी करून ते नागरिकांना अल्प दरात विकणार आहे.

ते झेंडे 13 ते 15 ऑगस्ट असे तीन दिवस घरावर लावण्यात येणार आहेत. त्यासाठी पालिकेने 20 इंच बाय 30 इंच आकाराचे कापडी 3 लाख झेंडे खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. लघुत्तम पुरवठादार 24 रूपये दराने झेंडे पालिकेस उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी 72 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. कापडे झेंडे तयार करण्याचे कारखाने गुजरात राज्यात आहेत. देशभरातून कापडी झेंड्यासाठी मोठी मागणी अचानक वाढली आहे. त्यामुळे बाजारपेठेत झेंड्यांचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला आहे. पालिका प्रशासनालाही झेंड्यांसाठी धावाधाव करावी लागत आहे.

अद्याप पालिका प्रशासनाच्या हातात झेंडे उपलब्ध झालेले नाहीत. जसे झेंडे उपलब्ध होतील, तसे तत्काळ क्षेत्रीय कार्यालयात त्याची 24 रूपये दराने विक्री केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे 25 हजार झेंडे बुधवारी (दि.3) उपलब्ध होणार आहे. त्या दिवसापासून झेंड्यांची विक्री सुरू केली जाणार आहे, असे पालिकेच्या अधिकार्यांनी सांगितले.

क्षेत्रीय कार्यालयात 24 रूपयास मिळणार तिरंगा
पालिकेच्या सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये झेंड्यांची विक्री केंद्र असणार आहेत. तेथे नागरिकांसाठी 24 रूपये दराने कापडी झेंडा उपलब्ध करण्यात येणार आहेत. नागरिकांनी तेथून झेंडा खरेदी करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.

तीन लाख घरांवर तिरंगा फडकणार : आयुक्त
शहरातील 3 लाख घरांवर तिरंगा फडकविण्यात येणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या चळवळीत नागरिक, शाळा, महाविद्यालय, विरंगुळा केंद्र, पर्यावरण प्रेमी, सामाजिक संस्था, सामाजिक व राजकीय संघटना, हाऊसिंग सोसायट्यांचा सहभाग वाढवावा. देश प्रेमाची भावना निर्माण करून प्रोत्साहित करण्याच्या सूचना आयक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

जनजागृतीसाठी शहरात 32 ठिकाणी फ्लेक्स लावण्यात येणार आहेत. शहरातील पाण्याची टाकी, उड्डाणपुलाची सजावट व विद्युत रोषणाई, वृक्षारोपण कार्यक्रम, चित्ररथ, सेल्फी पॉईंट, प्रभात फेरी, निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. विशेष व्यक्तींच्या हस्ते शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालय, विरंगुळा केंद्र, रुग्णालये, चित्रपटगृह अशा 75 ठिकाणी ध्वजारोहण करण्यात येणार आहे. तसेच, 11 ते 15 ऑगस्ट कालावधीत प्लॉगेथॉन घेण्यात येणार आहे.

मिळकतकर भरणार्‍या 7 हजार नागरिकांना मोफत तिरंगा
ध्वज खरेदी करून नागरिकांनी आपल्या घरावर अथवा इमारतीवर फडकवायचा आहे. नियमितपणे मिळकतकर भरणार्‍या 6 ते 7 हजार नागरिकांना मोफत तिरंगा ध्वज वाटप करण्यात येणार आहे.

Back to top button