पुणे : सांगवीतील तावरेवस्ती रस्त्याचा प्रश्न सुटणार कधी? | पुढारी

पुणे : सांगवीतील तावरेवस्ती रस्त्याचा प्रश्न सुटणार कधी?

सांगवी, पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यातील सांगवी परिसरातील तावरेवस्ती येथील रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या संपूर्ण रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अतिक्रमण झाले असून, रस्ता अरुंद झाला आहे. जागोजागी पावसामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच, एका ठिकाणी हद्दीचा निर्णय होत नसल्याने त्या भागात आजतागायत मुरमाचा एक खडादेखील पडला नाही. वारंवार या रस्त्याचा प्रश्न निर्माण होत असताना ग्रामपंचायत प्रशासन दखल घेत नसल्याने संतप्त महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सांगवी गावातील विकासकामांसाठी माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. तावरेवस्ती रस्त्याच्या कामासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, या रस्त्यावर दुतर्फा अतिक्रमणे झाली आहेत. रणवरे- देशमुखवस्ती भागात रस्त्याच्या हद्दीचा प्रश्न प्रलंबित असल्याने काम रखडलेल्या अवस्थेत आहे. त्या भागात भूमिगत गटरांचे कामही प्रलंबित आहे.

सुमारे एक हजार लोकवस्ती असलेल्या तावरेवस्ती या रस्त्याच्या कामासाठी निधीची तरतूद केली असताना रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पदाधिकार्‍यांना वेळ मिळत नसल्याने ग्रामपंचायत सदस्या नीलिमा जगताप, शैला जगताप, सुलभा देशमुख, वंदना चोरघडे, जयश्री देशमुख, नीलम देशमुख, बेबी चौरे आदी महिलांनी संताप व्यक्त करून तातडीने रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. जर लवकर प्रश्न मार्गी लावला नाही, तर आम्ही सहकुटुंब ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या देण्यासह भविष्यात येणार्‍या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा संतप्त महिलांनी या वेळी दिला.

रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला जाईल

याबाबत सरपंच चंद्रकांत तावरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, लवकरच या रखडलेल्या रस्त्याच्या कामाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून काम पूर्ण करणार असल्याचे स्पष्ट केले.

Back to top button