पुणे : पांढर्‍या कारल्याची हिरव्याशी बरोबरी; 120 ते 150 रुपये किलो दराने विक्री | पुढारी

पुणे : पांढर्‍या कारल्याची हिरव्याशी बरोबरी; 120 ते 150 रुपये किलो दराने विक्री

पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी (दि. 31) पांढर्‍या कारल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली. आवकेच्या तुलनेत मागणी जास्त राहिल्याने पांढर्‍या कारल्याच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ झाली. परिणामी, एरवी हिरव्याच्या तुलनेत कमी भाव मिळणार्‍या पांढर्‍या कारल्याने हिरव्या कारल्याची बरोबरी केल्याचे दिसून आले. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात हिरव्या व पांढर्‍या कारल्याच्या दहा किलोला 400 ते 450 रुपये भाव मिळाला, तर किरकोळ बाजारात एका किलोची 120 ते 150 रुपये या दराने विक्री सुरू आहे. श्रावणात मांसाहारी पदार्थ वर्ज्य असल्याने नागरिकांकडून फळभाज्यांना मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.

त्यात पावसाने विश्रांती घेतल्याने पुणे विभागातून फळभाज्यांची आवक वाढल्याचे दिसून आले. बाजारात दाखल होत असलेल्या फळभाज्यांच्या तुलनेत मागणी वाढल्याने फ्लॉवर, कोबी, ढोबळी मिरची व गाजराच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली. गुजरात येथील बटाटा व लसणाचा हंगाम संपल्याने येथून होणारी आवक बंद झाली आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी 90 ते 100 वाहनांमधून शेतमालाची आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ती स्थिर राहिल्याचे सांगण्यात आले.

परराज्यांतून आलेल्या शेतमालामध्ये कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे 10 ते 12 टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश व तमिळनाडू येथून 3 ते 4 टेम्पो शेवगा, कर्नाटक येथून 3 ते 4 टेम्पो घेवडा, 5 ते 6 ट्रक कोबी, इंदूर येथून 8 ते 9 टेम्पो गाजर, बेळगाव, धारवाड येथून 200 गोणी मटार, तर मध्य प्रदेशातून लसणाची 15 ते 16 ट्रक आवक झाली. स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 1400 ते 1500 पोती, टोमॅटो 13 ते 14 हजार क्रेट, फ्लॉवर 8 ते 10 टेम्पो, कोबी 4 ते 5 टेम्पो दाखल झाली आहे.

आवक वाढल्याने पालेभाज्यांचे भाव वधारले


पावसाने विश्रांती घेतल्याने बाजारात दर्जेदार पालेभाज्यांच्या आवकेत वाढ होऊ लागली आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. घाऊक बाजारात जुडीमागे कोथिंबिरीच्या भावात तब्बल 10 रुपयांनी वाढ झाली, तर कांदापातीच्या भावात जुडीमागे दोन रुपये, करडई आणि राजगिरा प्रत्येकी एक रुपयाने वाढ झाली आहे़ मेथी आणि शेपूच्या भावात प्रत्येकी दोन रुपयांनी घट झाली आहे़ रविवारी मार्केट यार्डातील तरकारी विभागात कोथिंबिरीची 90 हजार जुडी व मेथीची 50 हजार जुडी आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोथिंबिरीची आवक 60 हजार जुड्यांनी घटली.

Back to top button