पुणे : महोदय, राज्याराज्यांत भांडणे लावू नका! खा संजय सिंह यांची राज्यपालांवर टीका | पुढारी

पुणे : महोदय, राज्याराज्यांत भांडणे लावू नका! खा संजय सिंह यांची राज्यपालांवर टीका

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आणि मुंबईच्या आर्थिक राजधानीवरून केलेले वक्तव्य पाहून त्यांची मानसिकता दिसून येते. राज्यपाल महोदय, राज्याराज्यांत भांडणे लावू नका,’ अशी टीका आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी पुण्यात केली. आम आदमी पक्षाच्या युवा आघाडीचे राज्य अधिवेशन बिबवेवाडी येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात रविवारी पार पडले. त्या वेळी खासदार संजय सिंह यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मुंबईवरील वक्तव्यावर जोरदार टीका केली. ‘आपल्या भाषेत गोडवा ठेवा. दोन राज्यांमध्ये भांडण लावण्याचे तुमचे काम नाही.

आपल्या भाषेवर नियंत्रण ठेवा. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून, तुम्ही म्हणत असाल, गुजरात आणि राजस्थानमधून आलेले लोक राज्याची अर्थव्यवस्था चालवत आहेत, तर ते चुकीचे आहे. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, गुजरात, राजस्थान येथून येणारे लोक महाराष्ट्राची अर्थव्यवस्था चालवत नाहीत. उलट बाहेरील राज्यांतून आलेल्या कामगारांना महाराष्ट्र रोजगार देतो.

त्यामुळे आपल्याला महाराष्ट्राचे आभार मानायला पाहिजेत,’ असे खासदार सिंह म्हणाले. ‘आप’ने दिल्लीत केलेल्या कामामुळे पंजाबमध्ये यश मिळाले आहे. आता देशातील इतर राज्यांतही कामे पोहचविण्याची गरज आहे. महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढायच्या आहेत. राज्यात बदल घडवून आणायचा असून, त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे, असे खासदार सिंह म्हणाले.

Back to top button