कृषी यांत्रिकीकरणासाठी विक्रेते-उत्पादकांची सूची तयार होणार | पुढारी

कृषी यांत्रिकीकरणासाठी विक्रेते-उत्पादकांची सूची तयार होणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्यात कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या अंमलबजावणीसाठी उत्पादक-विक्रेत्यांची सूची तयार करण्यात येणार असल्याची माहिती कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) दिलीप झेंडे यांनी दिली. सद्यस्थितीत राज्यात कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण, राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण प्रकल्प, राष्ट्रीय फलोद्यान अभियान (एमआयडीएच), राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, पोकरा इत्यादी योजनेच्या माध्यमातून कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यात येते. तसेच शेतकर्‍यांना विविध प्रकारच्या यंत्रे, अवजारांसाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे अंमलबजावणी करून अनुदान देण्यात येत आहे.

केंद्र पुरस्कृत योजनांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कृषी आयुक्तालय स्तरावर उत्पादकांची व त्यांच्या अधिकृत विक्रेत्यांची सूची करण्यासाठी ऑफलाईन प्रस्ताव मागविण्यात येत आहे. यासाठी सादर करावयाच्या अर्जाचा नमुना, अटी व शर्ती, करारनामा, यंत्रे, औजारांसाठी यादी आदींचा तपशील कृषी विभागाच्या http://www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. ज्या उत्पादकांचा या प्रक्रियेद्वारे अनुदानावर पुरवठा करण्यासाठी पात्र सूचीमध्ये समावेश करण्यात येईल, त्यांच्यामार्फत पुरवठा होणार्‍या औजारांनाच अनुदान देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या प्रक्रियेसाठीचा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत 20 ऑगस्ट आहे. अधिक माहितीसाठी कृषी विभागाचे http://www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी व याबाबतचा प्रस्ताव प्रत्यक्षरीत्या कृषी उपसंचालक (कीटकनाशके व औजारे, गुनि-5), निविष्ठा व गुणनियंत्रण विभाग, कृषी आयुक्तालय, मध्यवर्ती इमारत, पुणे येथे सादर करण्याचे आवाहनही झेंडे यांनी केले आहे.

Back to top button