महर्षीनगर : कोणी शिक्षक देता का शिक्षक? संत ज्ञानेश्वर इंग्रजी प्रशालेतील पालकांची मागणी | पुढारी

महर्षीनगर : कोणी शिक्षक देता का शिक्षक? संत ज्ञानेश्वर इंग्रजी प्रशालेतील पालकांची मागणी

अनिल दाहोत्रे

महर्षीनगर : महापालिका शिक्षण विभागाचा कारभार म्हणजे ‘उंटावरून शेळ्या हाकणे’ यासारखा प्रकार आहे. संत ज्ञानेश्वर इंग्रजी माध्यम प्रशालेत एक महिन्यापासून शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली नाही. मात्र, शाळा सुरू आहे, याबद्दल पालक मोहसीन काझी यांनी शाळा प्रशासनास विचारणा केली असता, तीन वर्ग एक शिक्षक चालवीत असल्याचे समोर आले. संत ज्ञानेश्वर इंग्रजी प्रशालेत बालवाडी ते तिसरी असे पाच वर्ग आहेत. यात बालवाडी मिळून दोन शिक्षकांवर काम सुरू आहे. जागृत पालकांनी विचारणा केल्यावर शिक्षक जागे झाले. प्रत्यक्षात पाच वर्गाला पाच शिक्षक आवश्यक आहेत, पण त्यापेक्षा कमी शिक्षकांत शाळा कशी चालणार, हा विद्यार्थ्यांंच्या पालकांसमोर मोठा प्रश्न आहे.

शाळेत शिक्षक नियुक्त करण्याबाबत काझी यांनी तत्काळ शिक्षण विभागाशी पत्रव्यवहार केला. त्यानंतर एक शिक्षक तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आला. स्थानिक चारही माजी नगरसेवकांना शाळेत या समस्येबाबत माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. काही वर्गांत शाळेतील मदतनीससुद्धा शिक्षकाची कामे करीत आहेत. अशाप्रकारे चालणारे महापालिका शाळा प्रशासन खासगी इंग्रजी शाळांच्या स्पर्धेला तोंड कसे देणार, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. सर्वसामान्य गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी महापालिका शाळांशिवाय पर्याय नाही, असे विद्यार्थी पालक सचिन अडके यांनी सांगितले.

शाळेत सुविधांची वानवा…
शाळेत बसविलेली सीसीटीव्ही यंत्रणा नादुरुस्त
नव्याने बांधलेल्या स्वच्छतागृहातील दुरवस्था
शाळेच्या परिसराच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष
प विद्यार्थी विविध सुविधांपासून वंचित

शाळेत शिक्षक कमी आहेत, या माहितीसाठी प्रशासकीय अधिकारी चव्हाण यांना माहिती विचारावी. तेच शिक्षक कमी असल्याची माहिती देऊ शकतील.

                                                   -सुभाष सातव, सहायक, शिक्षण विभाग

शाळेमध्ये शिक्षक नाहीत, हे स्थानिक लोकप्रतिनिधींचे अपयश आहे. तेे वाढदिवस शाळेमध्ये विनापरवाना साजरे करतात आणि त्यांना शाळेत शिक्षक नाहीत याची माहिती नाही, हे विशेष आहे. माझा पाल्य या शाळेत असल्याने मी तत्काळ शिक्षण विभागाला याबाबत पत्र दिले.

           -मोहसीन काझी, पालक.

शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांंचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नाही. याबाबत शिक्षण विभागाशी संपर्क साधून तत्काळ शिक्षक उपलब्ध होण्यासाठी कार्यवाही केली जाईल.

               -श्रीनाथ भीमाले, माजी नगरसेवक

Back to top button