पुणे : सासवड नगरपरिषदेत ‘प्रहार’चे आंदोलन | पुढारी

पुणे : सासवड नगरपरिषदेत ‘प्रहार’चे आंदोलन

सासवड, पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुका प्रहार अपंग संघटनेचा सासवड नगरपरिषदमध्ये देण्यात येणारा 19 लोकांचा 5 टक्के दिव्यांग निधी काही कटकारस्थानी लोकांमुळे थांबविण्यात आला होता. या निषेधार्थ पश्चिम महाराष्ट्र प्रहार संघटना अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

सासवड नगरपालिकेकडून हा निधी खर्च करण्यात येत नसल्याचे उघड झाले आहे. इतर विकासकामे आणि योजनांसाठी कोट्यवधी रुपये खर्च होत असताना दिव्यांग व्यक्तींसाठी प्रशासन 5 टक्के निधी खर्च करताना टाळाटाळ का करीत आहे, असा प्रश्न धर्मेंद्र सातव यांनी उपस्थित केला.

सासवड नगरपरिषदेने 19 लोकांना 5 टक्के दिव्यांग निधीच्या यादीतून बाहेर काढले होते. आमच्या पाठपुराव्याला आज खर्‍या अर्थाने यश आले, हेच या वेळी म्हणता येईल, असे पुरंदर तालुका संपर्कप्रमुख काशिनाथ जगताप यांनी सांगितले. सासवड नगरपरिषद दिव्यांग लाभार्थ्यांना सन 2021-2022 या आर्थिक वर्षातील 5 टक्के दिव्यांग निधी वाटप लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर 1 ऑगस्टपर्यंत जमा करण्यात येईल, असे लेखी आश्वासन नगरपरिषदेने दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

या वेळी पुणे जिल्हाध्यक्ष महेंद्र निंबाळकर, महिलाध्यक्षा अनिता कदम, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप, उपाध्यक्ष बाबासाहेब पांडुळे, कार्याध्यक्ष बाबासाहेब जगताप, पुरंदर तालुकाध्यक्ष फिरोज पठाण, इंदापूर तालुकाध्यक्ष आनंद गायकवाड, दत्तात्रय पवार, प्रवीण जगताप, अश्विनी गायकवाड, दिलीप भोसले, हनुमंत नेटके आदी मान्यवर उपस्थित होते.

Back to top button