पुणे : लोणी-जारकरवाडी फाटा रस्त्यावर खड्डे | पुढारी

पुणे : लोणी-जारकरवाडी फाटा रस्त्यावर खड्डे

लोणी-धामणी, पुढारी वृत्तसेवा : लोणी-जारकरवाडीमार्गे मंचर (ता. आंबेगाव) या रस्त्यावर द्रौणागिरी व भोजणदरा ते निरगुडसर फाटा या रस्त्यावर जागोजागी लहान-मोठे खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे, हा रस्ता तयार होऊन एक वर्षही झाले नाही तोच रस्त्यावर खड्डे पडल्याने शासनाचे लाखो रुपये वाया गेले आहेत. या रस्त्यावर अनेक ठिकाणी डांबर उखडले आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात या रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे.

लोणी-जारकरवाडीमार्गे मंचर हा या भागातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. लोणी, धामणी तसेच पाबळ केंदूर, कान्हूर मेसाई, शिक्रापूर (ता. शिरूर) या परिसरातील नागरिकांना मंचर, अवसरी खुर्द, घोडेगाव, भीमाशंकर, नारायणगाव येथे येण्या-जाण्यासाठी हा रस्ता फार महत्त्वाचा आहे. एक वर्षातच या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

सध्या या भागात रिमझिम पाऊस सुरू असल्याने खड्डयांत पाणी साचले की खड्ड्यांचा अंदाज येत नाही. मध्यंतरी सार्वजनिक बांधकाम विभागाने निरगुडसर फाटानजीक मातीमिश्रित मुरूम टाकून खड्डे बुजविले. या रस्त्यावरील सर्वच खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित दर्जेदार बुजवावेत, अशी मागणी जारकरवाडीच्या सरपंच अ‍ॅड. रूपाली भोजणे यांनी केली आहे.

Back to top button