वडगाव मावळ : पदाधिकारी गेले अन् शिवसैनिक एकवटले | पुढारी

वडगाव मावळ : पदाधिकारी गेले अन् शिवसैनिक एकवटले

वडगाव मावळ : पुढारी वृत्तसेवा : मावळ तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्यासोबत शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला असला तरी मावळातील शिवसैनिकांनी मात्र शक्तिप्रदर्शन करत पक्षासोबतच राहण्याचा निर्णय सोमवारी (दि.25) झालेल्या बैठकीत घेतला. खासदार बारणे शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे यांनी लगेचच खा. बारणेंसोबत शिंदे गटात जाण्याचा निर्णय घोषित केला; परंतु तालुकाप्रमुख राजेश खांडभोर यांच्यासह इतर पदाधिकार्‍यांनी मात्र तातडीची बैठक घेऊन पक्षासोबत राहून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता.

परंतु, अवघ्या तीन दिवसांत त्याच पदाधिकार्‍यांनी आपला निर्णय बदलून खासदार बारणे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेऊन तीन दिवसांपूर्वी घेतलेली भूमिका बदलली. त्यामुळे मावळ तालुक्यातील शिवसेनेच्या गोटात चांगलीच चलबिचल सुरू झाली. याचा परिणाम म्हणून सोमवारी तालुक्यातील बहुसंख्य शिवसैनिकांनी एकत्र येऊन वडगाव मावळ येथे बैठक घेतली. यावेळी ज्येष्ठ पदाधिकारी भारत ठाकूर, शांताराम भोते, शादान चौधरी, मदन शेडगे, अनिकेत घुले, यशवंत तुर्डे, उमेश गावडे आदींसह शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणी कोठेही गेले तरी शिवसैनिक हे शिवसेना व ठाकरे परिवाराच्या सोबत आहेत, जे गेले त्यांनी मावळात शिवसेना वाढीसाठी काही केले नाही. उलटपक्षी पक्षात गटतट निर्माण करत शिवसेना फोडण्याचे काम केले, अशी टीका करून ते गेल्यामुळे पक्षाला धक्का नाही, तर नवसंजीवनी मिळाल्याचा उल्लेख अनेकांनी केली. त्यांच्या जाण्यामुळे मावळ शिवसेना कमकुवत झाली नसून सर्व शिवसैनिक गटतट बाजूला ठेवत एकत्र आल्याचे शक्तिप्रदर्शन यावेळी करण्यात आले. यावेळी, शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने वडगाव मावळ येथील बैठकीला हजर होते.

एकंदर, काही प्रमुख पदाधिकार्‍यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला असला तरी शिवसैनिक मात्र ठाकरेंसोबत असल्याने मावळातील शिवसेना नव्या दमाने उभी राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Back to top button