पुणे : राजगुरुनगर बसस्थानक आवारातील खड्डे बुजविले | पुढारी

पुणे : राजगुरुनगर बसस्थानक आवारातील खड्डे बुजविले

राजगुरुनगर, पुढारी वृत्तसेवा : राजगुरूनगर एसटी बसस्थानक आवारात पडलेले मोठ्या आकाराचे खड्डे जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे यांनी स्व:खर्चाने बुजविले. त्यामुळे बसस्थानक आवार खड्डेमुक्त होऊन स्वच्छ झाला आहे. प्रवाशी व नागरिक याबद्दल समाधान व्यक्त करित आहे.

राजगुरुनगर बसस्थानक उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठे बसस्थानक आहे. या बसस्थानकांत रोज शेकडो एसटी बसची ये-जा असते. हजारो प्रवाशी या बसस्थानकातून रोज प्रवास करत असतात. या आवारात गेल्या महिन्यापासून पावसाच्या पाण्यामुळे दीड-दोन फुटांचे खड्डे पडले होते. त्यामध्ये पाणी साचले होते. त्याला तळ्याचे स्वरूप आल्यामुळे बस चालकांसह प्रवाशी हैराण झाले होते.

स्थानक आवारात सर्वत्र पाण्याची डबकी आणि चिखल निर्माण झाल्याने प्रवाशांना कसरत करावी लागत होती. बस आल्यावर खड्ड्यातील साचलेले गढूळ पाणी प्रवाशांच्या अंगावर उडत असल्यामुळे विनाकारण त्रास सहन करावा लागत होता. तसेच या खड्ड्यांचा अंदाज दुचाकी वाहनचालकांना येत नसल्यामुळे अनेक जणांचे अपघात या ठिकाणी होत होते. शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे यांनी स्व:खर्चाने बसस्थानक आवारातील खड्ड्यामध्ये कठीण मुरुम टाकला. बसस्थानक आवार त्यामुळे खड्डेमुक्त झाला आहे.

खड्डे बुजल्याने यावर वाहने किंवा प्रवाशांना नागरिकांना ये-जा करताना होणारी गैरसोय दूर झाली आहे. वाहनचालक, प्रवाशांकडून समाधान व्यक्त होत आहे. आगारप्रमुख वसंत अरगडे, शिवसेना शहरप्रमुख संतोष राक्षे, राहुल मलघे, मृण्मय काळे, अशोक वाळुंज, मृग्नेश काळे, एल. बी. तनपुरे आदी काम करताना उपस्थित होते.

बसस्थानकातून कामानिमित्त एसटी बसने प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र प्रवाशांना खड्डे व साठलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागत होता. त्यामुळे वृद्ध, ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी प्रवाशांचे हाल व गैरसोय होत होती. राजगुरुनगर बसस्थानक प्रशासनाने खड्डे बुजवावे याबाबत माझ्याकडे पत्रव्यवहार केला असल्याने बुजविण्याचे काम हाती घेतले.

                                                        – बाबाजी काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य

Back to top button