पुणे : पाझर तलावात पोहताना तलाठ्याचा बुडून मृत्यू | पुढारी

पुणे : पाझर तलावात पोहताना तलाठ्याचा बुडून मृत्यू

नसरापूर, पुढारी वृत्तसेवा : भोर महसूल विभागातील तलाठ्याचा सोमवारी (दि. 25) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास वरवे खुर्द (ता. भोर) येथील लघु पाटबंधारेच्या तलावात पोहताना बुडून मृत्यू झाला. बुडताना मदतीचा धावा केला, मित्रांनी व स्थानिकांनी वाचवण्यासाठी प्रयत्नही केला. मात्र, तरीही त्यांचा बुडून मृत्यू झाला. शोध मोहिमेनंतर मृतदेह मिळाला आहे.

मुकुंद त्रिंबकराव चिरके (वय 35, सध्या रा. नसरापूर, ता. भोर’ मूळगाव रा. जहागीरमोहा, ता. माजलगाव, जि. बीड) असे बुडालेल्या तलाठ्याचे नाव आहे. घटनेची माहिती समजताच तातडीने प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील, मंडलाधिकारी श्रीनिवास कंडेपल्ली, विद्या गायकवाड, महसूल कर्मचारी, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जोशी, सहायक उपनिरीक्षक उमेश जगताप, वर्वेचे सरपंच नीलेश भोरडे, ग्रामसेविका शाहीन इनामदार आदी घटनास्थळी दाखल झाले.

मुकुंद चिरके हे मित्रांसमवेत रोज ट्रेकिंग व पोहण्यासाठी जात होते. सोमवारी ते त्यांच्या तीन मित्रांसमवेत वर्वे येथील पाझर तलावात पोहत असताना शिर्के यांना तलावाच्या मध्यभागी दम लागला. त्यांनी काठावर असलेल्या मित्रांना आवाज देऊन मदतीसाठी धावा केला. मित्रांनीही काठावर असलेली वल्हव घेऊन जात असतानाच खोल पाण्यात दम लागून चिरके बुडाले.

भोईजल संघ भोरच्या पथकाने पाण्यात शोध मोहीम राबवून दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मृतदेह पाण्याच्या बाहेर काढला. घटनास्थळी आलेल्या नातेवाइकांच्या आक्रोषाने उपस्थितांचे मन हेलावून गेले होते.

Back to top button