पुणे : ‘एमपीएससी’ची दमबाजी! अभ्यासक्रमावरून दबाव टाकल्यास कारवाई; विद्यार्थ्यांना इशारा | पुढारी

पुणे : ‘एमपीएससी’ची दमबाजी! अभ्यासक्रमावरून दबाव टाकल्यास कारवाई; विद्यार्थ्यांना इशारा

पुणे; पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीत बदल केल्याने विरोध करणार्‍या विद्यार्थ्यांना इशारा दिला आहे. ‘अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीत बदल केल्याच्या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, तर तो ‘एमपीएससी’वरील दबाव समजून कारवाई केली जाईल,’ असे एमपीएससीकडून आंदोलन करू पाहणार्‍या विद्यार्थ्यांना टि्वट्द्वारे सांगण्यात आले. शनिवारी रात्री एमपीएससीने टि्वट करून यासंदर्भात माहिती दिली. ‘एमपीएससी’ने अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला असून, यापुढे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) धर्तीवर एमपीएससीच्या परीक्षा होणार आहेत.

यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) हटवण्यात आले असून, विद्यार्थ्यांना सर्व पेपर विस्तृत स्वरूपात द्यावे लागणार आहेत.
2023 पासून सर्व परीक्षांसाठी हा निर्णय लागू होणार आहे. याला विद्यार्थी संघटना विरोध करत असून, इतकी वर्षे एमसीक्यू पद्धतीचा अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होईल, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. एमपीएससीने हा निर्णय 2023 ऐवजी 2025 पासून लागू करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे, ही मागणी मान्य न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला होता. मात्र, याला न जुमानता एमपीएससीने हा आयोगावर दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत कारवाईचा इशारा दिल्यानंतर अखेर विद्यार्थ्यांनी 25 जुलै रोजी करण्यात येणारे आंदोलन मागे घेतले आहे.

अभ्यासक्रम, परीक्षा पद्धतीतील बदलावर आयोग ठाम
पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित केले आहे. परवानगी नसताना आंदोलन केले तर विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल होतील. या पार्श्वभूमीवर आंदोलन केले जाणार नाही, असे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले आहे. अभ्यासक्रम बदल आणि परीक्षा पद्धतीत बदल करण्याच्या निर्णयावर एमपीएससी ठाम असल्याने आता विद्यार्थ्यांना हा निर्णय मान्य करून त्याप्रमाणे पुढील तयारी करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Back to top button