चाकणमध्ये नाशिक महामार्ग झालाय अपघाती; जागोजागी खड्डेच खड्डे | पुढारी

चाकणमध्ये नाशिक महामार्ग झालाय अपघाती; जागोजागी खड्डेच खड्डे

चाकण, पुढारी वृत्तसेवा: चाकणमध्ये पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर कांडगे कमान व अष्टविनायक नगरीसमोरील भागात रस्त्याचा दुभाजक फोडण्यात आला आहे. महामार्गावरून थेट बाजार समितीच्या चाकण मार्केटमध्ये जाण्यासाठी सोय व्हावी, यासाठी हा दुभाजक काढण्यात आला आहे. मात्र, हे ठिकाण आता अपघातांना निमंत्रण देत आहे. या दुभाजक फोडलेल्या ठिकाणी मुरूम, काँक्रीट असा कसलाही भराव टाकलेला नाही. त्यामुळे दुभाजक फोडून काढताना येथे मोठे खड्डे झाले असून त्यात आता पावसाचे पाणी साचत आहे. अनेक वाहने यात अडकत आहेत. येथील सिग्नल कार्यान्वित नाही. वाहतूक विभागाचा एकही कर्मचारी या भागात नसल्याने अनेक अपघात घडत आहेत.

सुसाट वाहनांच्या वेगावर काही ठिकाणी नियंत्रण यावे यासाठी पुणे-नाशिक महामार्गावर आळंदी फाट्यापासून चाकण ते वाकी खुर्द ( ता. खेड ) हद्दीत दुभाजक काढून गतिरोधक बसवण्यात आले आहेत. मात्र, याबाबत पुरेशा उपाययोजना केलेल्या नाहीत, सूचना फलक, पांढरे पट्टे या भागात नाहीत. अनेक ठिकाणी सिग्नल केवळ नावाला बसवण्यात आले असून, ते कार्यान्वित नाहीत. ट्रॅफिक पोलिस अथवा वॉर्डन येथे नसल्याने अपघात होतात.

महामार्गावरील दुभाजक फोडून एका बाजूकडून दुसर्‍याबाजूकडे वाहने नेताना आणि चुकीच्या दिशेने (राँग साईडने) वाहन येत असल्याने अपघाताची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात आहे. चाकण आणि वाकी खुर्द ( ता. खेड ) हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक बसवल्याने सुसाट वाहनांना रात्रीच्या वेळी याचा अंदाज येत नसल्याने अपघातांमध्ये वाढ झाली आहे. पुणे-नाशिक महामार्गावर अनावश्यक ठिकाणी मोठ-मोठाले स्पीडब्रेकर आणि आणि फोडलेले दुभाजक गंभीर अपघातांना निमंत्रण देत आहेत.

Back to top button