पुणे महापालिका : ओबीसींच्या ४६ जागांसाठी आरक्षण निघणार | पुढारी

पुणे महापालिका : ओबीसींच्या ४६ जागांसाठी आरक्षण निघणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : आगामी महापालिका निवडणुकीसाठी पुणे महापालिकेच्या 173 पैकी तब्बल 148 जागांवर फेर आरक्षण सोडत होणार आहे. यापूर्वी काढण्यात आलेल्या एससी व एसटी प्रवर्गाच्या 25 आरक्षित जागा वगळून उर्वरीत सर्वसाधारण 148 जागांमधून ओबीसींच्या 46 जागांचे आरक्षण सोडत निघणार आहे. त्यामुळे आता पुन्हा नव्याने राजकीय समीकरणे बदलणार असून अनेकांचे भवितव्य अडचणीत येण्याची शक्यता आहे.

राज्य निवडणूक आयोगाने येत्या 29 जुलैला ओबीसी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार आता पुणे महापालिकेच्या 173 जागांसाठी आता फेर आरक्षण सोडत निघणार आहे. या सोडतीबाबत आयोगाने दिलेल्या सुचनेनुसार यापुर्वी दि. 31 मे ला काढण्यात आलेले एससी व एसटी प्रवर्गाचे 25 जागांचे आरक्षण कायम राहणार असून उर्वरीत 148 जागांसाठी नव्याने आरक्षण सोडत निघणार आहे. त्यात आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 27 टक्के आरक्षण ओबीसी प्रवर्गासानुसार 46 जागा या प्रवर्गासाठी आरक्षित होणार आहे. त्यामध्ये 23 जागा महिला ओबीसी तर उर्वरीत 23 जागा ओबीसी खुल्या प्रवर्गासाठी असणार आहे.

दरम्यान ओबीसी आरक्षण सोडतीच्या या प्रक्रियेने महापालिकेच्या सर्व प्रभागांमधील राजकीय गणिते बदलणार आहे. यापुर्वी काही प्रभागांमध्ये दोन महिला तर काहींमध्ये एक महिला आणि दोन खुला अशी आरक्षणे पडली होती. मात्र, हे सर्व चित्र आता बदलणार असून ज्या प्रभागात दोन महिला जागा होत्या. त्यात प्रभागांत एक महिलेचे आरक्षण पडू शकते आणि दोन खुल्या जागांवर दोन महिला (ओबीसीसह) आणि एक खुला असे आरक्षण पडू शकणार आहे. परिणामी अनेक इच्छुकांची गणिते बिघडू शकणार आहे.

पुणे महापालिका

  • एकूण जागा – 173
  • प्रभाग संख्या – 58
  • एससी प्रवर्ग – 23
  • एसटी प्रवर्ग – 02
  • ओबीसी प्रवर्ग – 46
  • सर्वसाधारण महिला – 51
  • सर्वसाधारण खुला – 51

Back to top button