लोणावळा नगरपरिषद ऍक्शन मोडमध्ये ! शहरातील सर्वच बंगल्यातील स्विमिंग पुलचा सर्व्हे करण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे आदेश | पुढारी

लोणावळा नगरपरिषद ऍक्शन मोडमध्ये ! शहरातील सर्वच बंगल्यातील स्विमिंग पुलचा सर्व्हे करण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे आदेश

लोणावळा : लोणावळा शहरातील एका बंगल्यातील स्विमिंग पूल मध्ये एका चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागल्या नंतर शहरातील असे खाजगी स्विमिंग पुल आणि त्यांच्या सुरक्षा नियमांच्या बाबत प्रसिद्धी माध्यमातून अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे. त्यापार्श्वभूमीवर लोणावळा नगरपरिषद आता ऍक्शन मोड मध्ये आली आहे.

बुधवारी नगरपरिषद अधिकाऱ्यांची बैठक घेत नगरपरिषद अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेगवेगळ्या टीम बनवून पुढील दोन दिवसात शहरातील हर एक भागात असलेल्या बंगल्यात तसेच रो हाऊस मध्ये बांधण्यात आलेल्या स्विमिंग पुलचा सर्व्हे करून ते अधिकृत आहे की अनधिकृत आहे याचा अहवाल सादर करण्याबाबतचा आदेश लोणावळा नगरपरिषद मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी दिला आहे.

पर्यटन स्थळ तसेच थंड हवेचे ठिकाण म्हणून सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या लोणावळा शहरात पर्यटकांना खाजगी बंगले भाड्याने देण्याचा एक मोठा ट्रेंड सध्या सुरू आहे. येथे येणारे बहुतेक पर्यटक हे हॉटेल पेक्षा अशा खाजगी बंगल्यांना जास्त पसंती देतात. मात्र त्यातही ज्या बंगल्यात जलतरण तलाव आहे असे बंगले प्राधान्यक्रमाने आणि जास्त पैसे देऊन बुक केले जातात. त्यामुळे बंगले भाड्याने देणाऱ्या बंगले धारकांकडून आपल्या बंगल्याच्या किंवा रो हाऊसच्या आवारात ज्या ठिकाणी मोकळी जागा मिळेल तेथे अक्षरशः हवा तसा खड्डा खणून जलतरण तलाव तयार केला जातो आहे.

आणि हे तयार करीत असताना कोणत्याही सुरक्षा मानकांचे पालन केले जात नाही. असे बेकायदेशीर जलतरण तलाव असलेले शेकडो, हजारो बंगले, रो हाऊस लोणावळा शहर आणि आजूबाजूच्या परिसरात आहे. पण विशेष म्हणजे याबाबतची कोणतीही आकडेवारी संबंधित प्रशासनाकडे उपलब्ध नाही.

एकट्या लोणावळा नगरपरिषद हद्दीमध्ये असे बेकायदा स्विमिंग पूल असलेले असंख्य बंगले आणि रो हाऊस आहे. व्यवसायाची गरज म्हणून बंगले धारकांकडून बांधण्यात येत असलेल्या या स्विमिंग पुलबाबत कोणत्याही स्वरूपाचा डाटा नगरपरिषदेकडे आजमितीला उपलब्ध नाही. तसेच त्याबाबतीतल्या सुरक्षा मानकांच्या बाबतही खुद्द नगरपरिषद प्रशासनाकडे अस्पष्टता आहे. त्यापार्श्वभूमीवर शहरातील एकूण सर्व स्विमिंग पूलचा डाटा जमा करून त्यातील अनधिकृत पुल वर कारवाई करण्याचा तसेच स्विमिंग पूल बांधकाम नियमांमध्ये स्पष्टता आणण्याचा निर्णय मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी घेतला आहे.

Back to top button