ताथवडेतील मुख्य रस्त्यावर इतस्तत: कचरा | पुढारी

ताथवडेतील मुख्य रस्त्यावर इतस्तत: कचरा

ताथवडे: पुढारी वृत्तसेवा : ताथवडे येथील मुख्य रस्त्यावर जागोजागी कचर्‍याचे ढीग साचलेले आहेत. रावेतकडून डांगे चौकाकडे जाणार्‍या रस्त्यावर पवारवस्तीलगत कचर्‍याचे ढीग साचलेले दिसून येत आहे. याकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असून, कचर्‍याचे ढीग त्वरित उचलून परिसर स्वच्छ करण्याची मागणी होत आहे.

मुख्य रस्त्यावर कचराकुंडी ठेवण्यात आली होती; परंतु शहर कचरा कुंडीमुक्त करण्यासाठी येथील कचराकुंडी हटवण्यात आली आहे. त्यामुळे याच ठिकाणी काही बेजबाबदार नागरिक कचरा टाकत आहेत. त्यामुळे टाकलेला कचरा रस्त्यावर इतस्तत: पसरत आहे. पावसामुळे कचरा कुजून परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

ताथवडे रावेत रस्त्यावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. येथून जाताना पादचार्‍यांना कचर्‍याच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या परिसरातील कचर्‍याचे ढीग लवकर उचलून परिसर स्वच्छ करावा अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.

Back to top button